वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आजपासून तीन दिवस विठुरायाचं दर्शन बंद; ‘हे’ आहे कारण

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी पंढरपूरचे मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत मुखदर्शनासह पदस्पर्श दर्शनही बंद राहणार आहे. मंगळवारी रात्री शेजारती झाल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्ती संवर्धनाच्या कामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तींचे दीर्घकालीन जतन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाचे उपअधीक्षक डॉ. एस. विनोद कुमार, राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडणार आहे.

23 ते 25 सप्टेंबर मंदिर दर्शनासाठी बंद
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींच्या जतन व संवर्धनासाठी 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर 26 सप्टेंबरपासून भाविकांसाठी दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.


वारकरी, भाविक आणि नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच संवर्धनाच्या या प्रक्रियेत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी केले आहे.
विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर पाचव्यांदा वज्रलेप
विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींचे यापूर्वी 1988, 2005, 2012 आणि 2020 मध्ये संवर्धन करण्यात आले होते. मागील संवर्धनाला सुमारे पाच वर्षे पूर्ण झाल्याने मूर्तींच्या नियमित देखभालीच्या अनुषंगाने पुन्हा संरक्षक आवरण अर्थात वज्रलेप देण्यात येणार आहे.
ही मूर्ती संवर्धनाची पाचवी प्रक्रिया असून, या कामासाठी तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. संवर्धन पूर्ण झाल्यानंतर भाविकांना पुन्हा नियमित दर्शन घेता येणार आहे.