सियाच्या फोनमधून 21 वर्षीय मानसी गोविंदपूरकरचं कनेक्शन समोर! केतनच्या हत्येनंतर ChatGPT ला विचारलं, ‘दुःख कसं व्यक्त करायचं?’

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल प्रकरणात चार्जशीटनंतर तपासातील अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात केतन अग्रवाल प्रकरणाचा तपास करताना पुण्यात यापूर्वी घडलेल्या हत्याकांडांसह लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूच्या घटनांचाही सखोल अभ्यास करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सिया गोयलच्या फोनमधून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. याच तपासात मानसी गोविंदपूरकर मृत्यू प्रकरणाचा संदर्भही समोर आला आहे. केतनला ठार करण्याच्या कटाच्या पार्श्वभूमीवर सियाने लोणावळा आणि आसपासच्या परिसराची माहिती घेतल्याचे तपासात आढळले आहे. यामध्ये टायगर पॉइंट आणि लोहगड परिसराची माहिती शोधण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोणावळा परिसरात यापूर्वी दरीत पडून झालेल्या मृत्यूच्या घटनांचाही आरोपींकडून शोध घेण्यात आला. त्यावेळी मानसी गोविंदपूरकर या तरुणीच्या मृत्यूची माहिती आरोपींच्या शोधात आल्याचे तपासात समोर आले आहे. टायगर पॉइंट तसेच लोहगड परिसराशी संबंधित या घटनेची माहिती आरोपींनी शोधल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.


मानसी गोविंदपूरकरचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी
20 मार्च 2025 रोजी सांगवी येथील रहिवासी मानसी गोविंदपूरकर हिचा मृतदेह लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. 21 वर्षीय मानसीचा मृतदेह नवग्रह मंदिराजवळील झुडपांमध्ये आढळला होता. पोलिसांच्या तपासानुसार, या घटनेशी संबंधित माहिती सियाने शोधल्याचे समोर आले असून त्यानंतर केतनला लोहगड परिसरात नेण्याचा कट आखण्यात आल्याचे तपासात नमूद आहे.
सिया गोयल, चेतन चौधरी आणि रितेश हंगे यांच्यात सोशल मीडिया आणि मेसेजिंग माध्यमातून ही माहिती शेअर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संवादासंदर्भातील काही पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दरम्यान, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हत्येचा कट रचण्याच्या दिवशी आरोपींनी सुरुवातीला राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा अभ्यास केला. या प्रकरणात झालेल्या चुका आणि तपासात समोर आलेल्या बाबींची माहिती आरोपींनी शोधल्याचे तपासात आढळल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
यानंतर लोणावळा, टायगर पॉइंट आणि आसपासच्या परिसरातील विविध ठिकाणांची माहितीही शोधण्यात आली. त्यामुळे केतन अग्रवाल प्रकरणातील तपासाला आता नवे कनेक्शन मिळाले असून, पुढील न्यायालयीन सुनावणीत आणखी कोणते पुरावे आणि खुलासे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.