महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार! 15 जिल्ह्यांना अलर्ट; पुढील 8 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : राज्यात एकीकडे दुष्काळाची तीव्रता वाढत असताना दुसरीकडे हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने पिकांचा प्रश्न गंभीर झाला असून शेतकरी चिंतेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सध्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आहेत. अशातच काल रात्री राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 8 तासांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून या भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

लातूर, धाराशिव, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान, देशातील तब्बल 13 राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसासाठी हवामान अनुकूल राहण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून पुढील 12 तासांत त्याचे डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 62 किलोमीटर किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी 75 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 23 ते 24 सप्टेंबरदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून काही जलसाठे कोरडे पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत.
दक्षिण सोलापुरातील नांदणी गावाचा प्रमुख पाण्याचा स्रोत असलेला पाझर तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एकीकडे पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे पावसाचा इशारा, अशा दुहेरी परिस्थितीत शेतकरी आणि ग्रामस्थांचे लक्ष आता हवामानाच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे.