मित्रासोबत दुचाकीवरून जात होती, अचानक तरुणांनी घेरलं; तरुणीला उचलून नेलं, अश्लील कृत्य करत व्हिडिओ व्हायरल केला, डोंगरात लपलेल्या मुख्य आरोपीला पोलिसांची गोळी

पाटणा : समाजमाध्यमांवर काही सेकंदांचा व्हिडिओ समोर आला आणि बिहारमधील जमुई पोलिसांची यंत्रणा आरोपींच्या शोधासाठी सक्रिय झाली. मित्रासोबत दुचाकीवरून जाणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या आरोपींचा शोध घेताना मुख्य आरोपी नंदन यादव मडवा डोंगरात लपून बसल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला घेरल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या गोळीबारात नंदनच्या पायाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ही घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास जमुई-लखीसराय मार्गावर घडली. तरुण आणि तरुणी दुचाकीवरून जात असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं. त्यानंतर तरुणीसोबत असभ्य वर्तन करण्यात आलं. मुख्य आरोपी नंदन यादव याने तिला उचलून नेल्याचा आणि तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. आरोपींनी या घटनेचं चित्रीकरण केलं आणि संबंधित व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित केला. व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली.

पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. तपासादरम्यान यापूर्वीच तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नंदन यादव आणि हरेराम यादव यांचा शोध सुरू होता. नंदन मडवा डोंगरात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसराला घेराव घातला. त्याला शरण येण्यास सांगण्यात आलं. मात्र, त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. जखमी नंदनवर जमुई सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, हरेराम यादव यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचा पाय मोडल्याची माहिती असून त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला गोळी लागली की नाही, याबाबत स्पष्टता नाही. नंदन आणि हरेराम हे दोघेही सज्ञान असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
बिहारच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक सुहिता अनुपम यांच्या माहितीनुसार, या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचाही सहभाग आहे. पोलिसांनी उपलब्ध व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवली आहे. या प्रकरणात आता एकही आरोपी फरार नसल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.
दरम्यान, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली. आरोपी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असला तरी गुन्हा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. प्रत्येक आरोपीवर झालेल्या कारवाईची माहिती प्रशासनाने द्यावी, असंही त्यांनी म्हटलं. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.