दुष्काळ जाहीर? सोशल मीडियावर यादी व्हायरल; कृषिमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

मुंबई : राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी पावसाअभावी अडचणीत सापडले आहेत. पिकांचे नुकसान होत असल्याने दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर दुष्काळ जाहीर झाल्याची कथित यादी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या यादीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असतानाच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यादीत कोणतेही तथ्य नसून राज्यात अद्याप दुष्काळ जाहीर करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, त्यांनी पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला आहे. या भागातील परिस्थिती गंभीर असून पावसामध्ये मोठा खंड पडला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली आहेत. या संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले.


एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता मदत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना यापूर्वीच मदतीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे भरणे यांनी सांगितले.
सध्या ट्रिगर-1 लागू असून ट्रिगर-2 संदर्भातील तांत्रिक विश्लेषण सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होणार असून आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून यासंदर्भात सादरीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळ जाहीर करण्याबाबत सोशल मीडियावर फिरत असलेली यादी अधिकृत नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अशा व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्जमाफीच्या याद्यांबाबतही भरणेंचा दावा
कर्जमाफीच्या मुद्द्यावरही कृषिमंत्री भरणे यांनी माहिती दिली. सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांची यादी पुन्हा बँकांकडे पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बँकांकडून काही चुकीच्या याद्या पाठवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित याद्या तातडीने दुरुस्त करून पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचाही विचार केला जाईल, असे भरणे यांनी सांगितले.
दुष्काळाच्या मागणीदरम्यान कर्जवसुलीच्या नोटिसा
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून मोर्चे, आंदोलने आणि रास्ता रोको सुरू असतानाच कर्जवसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
तुळजापूर तालुक्यातील पांगरवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी गुंडीपंत मारडकर यांना बँक ऑफ महाराष्ट्रकडून कर्जवसुलीबाबत तीन नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या नोटिसांमध्ये वकिलांची फी देखील शेतकऱ्याने भरावी, अशा सूचना असल्याचे सांगण्यात येत आहे.
एकीकडे पावसाचा खंड, पिकांचे नुकसान आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे मदत आणि कर्जमाफीची अपेक्षा असताना कर्जवसुलीच्या नोटिसा मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
आता राज्य सरकार दुष्काळाबाबत नेमका काय निर्णय घेते आणि शेतकऱ्यांना मदत कधी जाहीर होते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.