मोठी बातमी! राज्यातील 5 शिक्षक-पदवीधर मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर; मतदानाची तारीख समोर


मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी 29 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी होणार असून, 6 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल, तर 9 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून, 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता संबंधित मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू होणार असून, कोणत्या मतदारसंघातून कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या 5 जागांवर निवडणूक?

महाराष्ट्रातील पाच विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ 6 डिसेंबर 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याच्या माहितीनुसार औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भानुदास चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

उमेदवारीकडे लक्ष

पाचही जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होतील. त्यामुळे या पाच मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळते आणि निवडणुकीचे राजकीय चित्र कसे तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!