दुष्काळाच्या आगीत राजकारणाचा भडका! शरद पवारांच्या दौऱ्यावर गोरेंचा टोला; सोलापुरात 80 टक्के पिकं उद्ध्वस्त


सोलापूर : पावसाने दीड महिन्यापासून पाठ फिरवल्याने महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती अधिकच गंभीर असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार २८ सप्टेंबरपासून दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याने दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलं आहे. शरद पवारांच्या या दौऱ्याचा सरकारला काही फायदा होईल का, असा प्रश्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारण्यात आला. त्यावर, “अशा अनुभवाने फायदा झाला असता तर राज्यात दुष्काळच पडला नसता,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.

जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सध्या अनेक कामं सुरू असल्याचं सांगितलं. ही कामं आधी झाली असती तर दुष्काळाची परिस्थिती आली नसती, असा दावा त्यांनी केला. दुसरीकडे, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सोलापुरात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात केवळ सुमारे ५० टक्के पाऊस झाला असून जवळपास ८० टक्के पिकांचं नुकसान झाल्याचं गोरे यांनी सांगितलं. पुढील १५ दिवसांत पाऊस झाला नाही, तर पिकांचं नुकसान १०० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, शेतीसाठी पाणी, टँकर आणि जनावरांच्या चाऱ्याच्या संभाव्य संकटासाठी प्रशासनाने आतापासूनच तयारी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

सोलापुरात परतीचा पाऊस १५ ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित असल्याचं गोरेंनी सांगितलं. मात्र, पावसाची वाट न पाहता पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे आणि अहवाल वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. उजनी धरण भरलेलं असलं तरी जिल्ह्यातील ६८ गावांमध्ये टँकर सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन वर्षभरासाठी पाणी राखीव ठेवण्याचं नियोजन सुरू असल्याचं गोरे म्हणाले.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी ठरावीक निकष आहेत. ५ ऑक्टोबर ही केंद्राची संबंधित तारीख असून परतीचा पाऊस लक्षात घेऊन त्यानंतर दुष्काळाबाबत निर्णय घेतला जातो, असं गोरे यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांची फी, रोजगार आणि पिण्याच्या पाण्यासह विविध बाबींवर शासन विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, पंचनामे होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पिकांवर रोटावेटर फिरवू नये, असं आवाहन त्यांनी केलं. काही ठिकाणी पाऊस पडला तरी पिकांना फायदा होणार नाही, तर काही भागात परतीचा पाऊस झाल्यास पिकं पुन्हा उभी राहू शकतात, असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी गोरेंवर केलेल्या ‘जलनायक’ आणि ३४ टँकरच्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. आपल्या मतदारसंघातील टँकरकडे लक्ष असल्याचं सांगत मोहिते पाटील यांनीही आपल्या भागाचा दौरा करावा, असा पलटवार गोरेंनी केला. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार आणि दुष्काळाबाबत सरकारचा निर्णय काय असणार, याकडे आता शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!