दरेकरांचा ताफा फ्रीवेवरून जात होता अन् अचानक धाडकन्! कार-टॅक्सीची धडक, आमदार गाडीतून खाली उतरले अन्…

मुंबई : गणेशोत्सवाच्या धामधुमीत मुंबई फ्रीवेवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. दरेकरांचा ताफा फ्रीवेवरून जात असताना ताफ्यातील एका कारची टॅक्सीला धडक झाली. या अपघातामुळे काही काळ घटनास्थळी खळबळ उडाली. मात्र, अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली असून प्रवीण दरेकर सुखरूप असल्याची माहिती आहे.
गणेशोत्सवाचे शेवटचे दिवस असल्याने मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी भाविकांसोबतच राजकीय नेत्यांचीही शहरभर ये-जा सुरू आहे. खासगी वाहनं आणि टॅक्सींची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचा ताणही दिसून येत आहे. याचदरम्यान प्रवीण दरेकर यांचा ताफा मुंबई फ्रीवेवरून जात असताना ही घटना घडली.

ताफ्यातील एका कारची टॅक्सीशी धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. धडक झाल्यानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या अपघातात मोठी जीवितहानी झालेली नाही. दरेकरांच्या ताफ्यातील काही वाहनांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे.


अपघातानंतर दरेकर स्वतः खाली उतरले
या घटनेतील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर प्रवीण दरेकर स्वतः आपल्या कारमधून खाली उतरले. त्यांनी घटनास्थळी थांबून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे खासगी सुरक्षा रक्षकही होते. अपघातानंतरचा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये दरेकर व्यवस्थित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून वाहतूक सुरळीत
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित वाहनं बाजूला करून फ्रीवेवरील वाहतूक सुरळीत केली. अपघातात ताफ्यातील कारसोबत टॅक्सीलाही नुकसान झाल्याचे दिसून आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारचाही अपघात झाला होता. विलेपार्ले येथे त्यांच्या चालकाकडून कार चालवली जात असताना पादचारी सुनील धुलविया यांना कारची धडक बसली होती. या घटनेत धुलविया किरकोळ जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची वाढलेली वर्दळ आणि त्यात फ्रीवेवर झालेला हा अपघात यामुळे काही काळ घटनास्थळी लक्ष वेधले गेले. सुदैवाने प्रवीण दरेकर सुखरूप असून अपघाताची तीव्रताही कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.