ट्रक थांबवला नाही, मग सुरू झाला 6 तासांचा थरार! चाकणमध्ये 1.13 कोटींचा गुटखा पकडला; 5 जणांविरोधात गुन्हा, MCOCAचीही तयारी


चाकण : ट्रक थांबवण्याचा इशारा करूनही चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले… त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सुरू केलेला पाठलाग तब्बल सहा तास चालला. अखेर पोलिसांच्या मदतीने चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवण्यात आला आणि तपासणी करताच महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा-पानमसाल्याचा तब्बल 1 कोटी 13 लाख 54 हजार 600 रुपयांचा साठा समोर आला. या कारवाईने प्रतिबंधित गुटख्याच्या वाहतुकीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला गुप्त माहिती मिळाली होती की, प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा टाटा ट्रक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहे. त्यानुसार 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता कारवाई सुरू करण्यात आली. सुरुवातीला हा ट्रक समृद्धी महामार्गाने भिवंडी-ठाण्याच्या दिशेने येणार असल्याची माहिती होती. मात्र, ट्रकने अचानक नियोजित मार्ग बदलला आणि संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.

मार्ग बदलल्याचे लक्षात येताच प्रशासनाने संभाव्य मार्गांवर पथके तैनात केली. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने रवाना झाले, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोलनाक्यावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी ट्रक आडवा लावून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता ट्रक पुढे दामटला. यानंतर सावळे यांनी ट्रकचा पाठलाग सुरू ठेवला.

पुढे स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. अखेर चाकण-तळेगाव चौकात ट्रक शिताफीने अडवण्यात आला. सुमारे सहा तासांच्या या पाठलागानंतर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ट्रक ताब्यात घेण्यात आला. ट्रकची झडती घेतल्यानंतर महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विविध कंपन्यांचा पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा मोठा साठा आढळून आला.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला – 29,95,200, तुळशी रॉयल जाफरानी जर्दा – 9,60,000, तानसेन सुगंधित पानमसाला – 24,94,800, टी.ओ. प्रिमियम जर्दा – 2,64,600 आणि आर.एम.डी. पानमसाला – 26,40,000 यांचा समावेश आहे. याशिवाय MH 18 BZ 2350 क्रमांकाचा ट्रक – 20 लाख असा एकूण 1,13,54,600 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्तीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाची प्रक्रिया थांबली नाही. संबंधित कागदपत्रे, जप्तीची नोंद आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे यांनी चाकण उत्तर पोलिस ठाण्यात संबंधितांविरोधात फिर्याद दाखल केली.

या प्रकरणात नफीस मेहबूब खान (वय 40, रा. हरियाणा) – वाहनचालक, निलेश राठी (रा. खामगाव, जि. बुलढाणा) – मालक/पुरवठादार, अरुण पाटील (रा. जळगाव) – मालक/पुरवठादार, मे. J.M.D. Enterprises (धुळे) – वाहन मालक आणि संजय माटा (रा. इंदूर, मध्य प्रदेश) – वाहतूकदार यांचा समावेश आहे.

या प्रकरणी BNS कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मधील कलम 26(2)(i), 26(2)(iv), 27(3)(e), 30(2)(a) आणि 59 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार केवळ प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या वाहतुकीपुरता मर्यादित आहे का, की त्यामागे मोठी पुरवठा साखळी कार्यरत आहे, याचा तपास करण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. आरोपींचे पूर्वगुन्हे, गुटख्याची पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहार तपासून दोष आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA), 1999 अंतर्गत कारवाई करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्याची विनंती पोलिसांना करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित आणि आरोग्यास घातक अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांना अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा गैरप्रकाराबाबत तक्रार असल्यास 1800222365 या टोल-फ्री क्रमांकावर तसेच Food & Drug Grievance Portal वर तक्रार नोंदवता येणार आहे.

“ग्राहकांच्या आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!