शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफाच अडवला! बशीत काजू-बदाम देत संताप व्यक्त; “बैठकीत खाऊ नका, आमच्या पिकांच्या नुकसानीवर ठोस मदत द्या”


हिंगोली : मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत खरीप पिके संकटात सापडली आहेत. पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि वाढत्या अडचणींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोली जिल्ह्यातील टाकळगाव येथे पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्याला अडवून घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांनी थेट काजू-बदामाची बशी कृषिमंत्र्यांसमोर ठेवत नांदेडमधील आढावा बैठकीतील सुकामेव्याच्या पाहुणचारावरून संताप व्यक्त केला.

शेतकऱ्यांनी “बैठकीत बसून काजू-बदाम खाऊ नका, शेतकऱ्यांच्या नुकसानीवर ठोस उत्तर द्या,” अशा शब्दांत कृषिमंत्र्यांना जाब विचारला. पावसाअभावी पिके करपली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ आश्वासन न देता संकटाच्या काळात प्रत्यक्ष मदत कधी आणि कशी मिळणार, याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा मुद्दा हिंगोलीत गाजला

शनिवारी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी काजू-बदामाचा पाहुणचार झाल्याचे व्हिडीओ समोर आल्यानंतर हा प्रकार चर्चेत आला. दुष्काळामुळे शेतकरी संकटात असताना बैठकीत सुकामेवा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. याच मुद्द्याचा संदर्भ देत हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना काजू-बदाम देत निषेध नोंदवला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते. टाकळगाव येथे नुकसानीची पाहणी सुरू असताना शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना घेराव घालत आपल्या मागण्या मांडल्या. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’ – भरणे

शेतकऱ्यांच्या संतापावर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. नांदेडच्या आढावा बैठकीत आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, पिकांची परिस्थिती आणि नुकसानीची माहिती मांडली असून त्याचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शेतकऱ्यांची पिके हातातून गेली आहेत. या पिकांवर त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली होती, ती आता भंगली आहेत. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” असे भरणे यांनी सांगितले.

तसेच पिण्याच्या पाण्याची आणि पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असेही भरणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना काजू-बदाम देत केलेला निषेध आणि नांदेडच्या बैठकीतील सुकामेव्याचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, याकडे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!