संतापजनक! शेतकरी दुष्काळाने त्रस्त, नांदेडच्या बैठकीत मंत्र्यांसमोर काजू-बदाम; कृषीमंत्र्यांच्या बैठकीचा व्हिडीओ व्हायरल


नांदेड : मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांची आणि दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, या बैठकीत मंत्री, खासदार आणि लोकप्रतिनिधींसमोर काजू-बदामासह सुकामेवा ठेवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आल्याने वाद निर्माण झाला आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात ही बैठक झाली. छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीला मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नांदेड, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यांतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली होती.

या बैठकीला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार अजित गोपछडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, सैईद खान, कैलास पाटील, अमर राजूरकर, तुषार राठोड, आनंदाराव पाटील बोंढारकर यांच्यासह अनेक आजी माजी आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित आहेत. मात्र, या बैठकीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दुष्काळी बैठकीत काजू-बदामाचा पाहुणचार

दुष्काळाच्या स्थितीवर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींचा जोरदार पाहुणचार करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींना चक्क काजू, बादामाचा खुराक देण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आठ जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करताना मंत्री आणि आमदार चक्क काजू बादाम खात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

यात खासदार संजय जाधव बादामावर ताव मारताना दिसत आहेत. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परिस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर काजू आणि बादामच्या प्लेट तातडीने हटवण्यात आल्या. मात्र, लोकप्रतिनिधींच्या बैठकीत काजू, बादामाचा पाहुणचार देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

‘अधिकाऱ्यांना डोकं आहे का?’; संजय शिरसाटांचा सवाल

या प्रकारावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीचा विषय आणि परिस्थिती लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी नियोजन करायला हवे होते, असे त्यांनी म्हटले. अधिकाऱ्यांकडून काही गोष्टी केल्या जातात आणि त्याचा परिणाम मात्र लोकप्रतिनिधींवर होतो, अशी प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, संबंधित बैठकीत काजू-बदाम ठेवण्याच्या प्रकारावरून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर टीका सुरू आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!