शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईवर मोठी अपडेट! 5 ऑक्टोबरला पंचनामे, पण त्याआधीच मदतीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांनी सांगितलं पुढचं पाऊल


नांदेड : खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. सरकारकडून ५ ऑक्टोबरपासून नुकसानीचे पंचनामे सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असताना, नुकसानभरपाईसाठी पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट न पाहता मदतीचा विचार केला जाणार असल्याचे संकेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांमध्ये सोयाबीनसह इतर पिकांचे किती नुकसान झाले आहे, याचा सध्या आढावा घेतला जात आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनचे पीक करपले असून शेंगांमध्ये दाणेच भरले नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली आहे. केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरीव मदत देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.

‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’

दुष्काळाच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरही भरणे यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात राजकारण न करता सर्वांनी त्यांच्या मदतीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, असे भरणे म्हणाले.

पीक विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न

ज्या भागांमध्ये पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे, तिथे मुदतपूर्व पीक कापणी प्रयोग करून शेतकऱ्यांना पीक विम्याचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पंचनाम्याची औपचारिक प्रक्रिया सुरू राहणार असली तरी प्राथमिक अहवालांच्या आधारे शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यावर सरकारचा भर असल्याचे कृषी मंत्र्यांनी सांगितले.

नांदेडमध्ये दुष्काळी परिस्थितीचा आढावा

नांदेडमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला ऊर्जा मंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री अतुल सावे, खासदार अशोक चव्हाण, खासदार रवींद्र चव्हाण, संजय जाधव, रामराव वडकुते, नागेश पाटील आष्टीकर, कल्याण काळे, अजित गोपछडे यांच्यासह अनेक आजी-माजी आमदार उपस्थित आहेत. काही लोकप्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग घेतला.

अशोक चव्हाणांचीही तातडीच्या मदतीची मागणी

भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी पीक कापणी प्रयोगाची अट न घालता शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली. पीक विमा कंपन्या ‘ट्रिगर’च्या नावाखाली वेळकाढूपणा करतात, त्यामुळे त्यांची प्रतीक्षा न करता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील ११ नव्हे तर सर्व १६ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना पुरेसा वीजपुरवठा द्यावा आणि पंचनाम्यांची प्रतीक्षा न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली. त्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!