ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी! NCMC कार्डच्या नियमांत बदल; OTPपासून हरवलेल्या कार्डापर्यंत, जाणून घ्या नवे नियम

पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांसाठी सुरू असलेल्या NCMC कार्ड नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार OTPचा पर्याय, हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळवण्याची सुविधा तसेच QR कोड पावतीद्वारे तात्पुरता सवलतीचा प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बायोमेट्रिक जुळत नसेल तर आधार OTPचा पर्याय
ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे बोटांचे ठसे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात जुळत नाहीत, त्यांना 21 सप्टेंबर 2026 पासून आधार कार्डशी जोडलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेल्या OTPच्या आधारे NCMC कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचणी येणाऱ्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.


हरवलेले किंवा चोरीला गेलेले कार्ड पुन्हा मिळणार
21 सप्टेंबरपासून हरवलेले किंवा चोरीला गेलेले NCMC कार्ड ब्लॉक करून 199 रुपये शुल्क भरून नव्याने कार्ड मिळवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
25 सप्टेंबरपासून कार्ड वितरण
19 सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना 25 सप्टेंबर 2026 पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
QR कोड पावतीवर सवलतीचे तिकीट
16 सप्टेंबरपासून NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांना QR कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ETIM मशीनवर स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रवाशाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे.
ही नोंदणी पावती 30 दिवसांपर्यंत वैध राहणार आहे. या कालावधीत लाभार्थ्यांनी NCMC कार्ड ॲक्टिव्ह करून त्यात टॉप-अप करणे आवश्यक आहे. त्यामुळे सवलतीचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC नोंदणी करा
एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र प्रवाशांनी तातडीने NCMC कार्डची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. सवलतीच्या प्रवासाची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाकडून हे बदल करण्यात आले आहेत.