दीड महिन्यांची प्रतीक्षा संपली! लातूरसह मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी; बळीराजाला दिलासा

मुंबई : मराठवाड्यात दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. दीर्घ विश्रांतीनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळण्याची शक्यता आहे.
लातूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस
लातूर जिल्ह्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर शहरासह ग्रामीण भागात मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.

पाऊस नसल्याने मागील काही दिवसांपासून वातावरणात उष्णता वाढली होती. मात्र, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.


परभणीत पावसाच्या सरी; पिकांना दिलासा
परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पावसाअभावी वाळून जाण्याच्या स्थितीत असलेल्या भाजीपाला पिकांसह खरीप पिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, जमिनीतील ओलावा वाढण्यासाठी आणि पिकांना पूर्णपणे आधार मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
हिंगोलीत दोन महिन्यांनंतर पाऊस
हिंगोली जिल्ह्यातही जवळपास दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. विशेषतः सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले आहेत.
आता झालेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि सोयाबीन वगळता इतर खरीप पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाची शक्यता कायम आहे.