बारामतीत गरोदर महिलेवर अत्याचार अन् हत्या; आरोपीचे क्रौर्य पाहून पोलीसही हादरले, अवघ्या 2 तासांत अटक

बारामती : बारामती तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पणदरे एमआयडीसी परिसरात एका गर्भवती महिलेच्या घरात घुसून तिच्यावर हातोड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत अवघ्या दोन तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रामचंद्र माने (वय 26, रा. पणदरे, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपी महिलेच्या घरात जबरदस्तीने शिरला. त्याचा उद्देश शारीरिक संबंध ठेवण्याचा असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

महिलेने त्याला विरोध केला. यावेळी आरोपीने तिच्या डोक्यावर आणि मानेवर हातोड्याने वार केल्याचे तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली.


गंभीर जखमी अवस्थेत अत्याचार केल्याचा आरोप
महिला गंभीर जखमी अवस्थेत असतानाही आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा प्रकार कोणाला समजू नये, तसेच स्वतःचा बचाव करण्याच्या उद्देशाने आरोपीने महिलेचा गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दागिने घेऊन आरोपी फरार
हत्येनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात लुटीचाही भाग असल्याचे तपासातून समोर आले आहे.
अवघ्या दोन तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात
घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यानंतर अवघ्या दोन तासांत संशयित गणेश माने याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मृत महिलेचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यामध्ये महिला गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलिसांकडून सुरू आहे.