मोदक, खवा अन् प्रसादावर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई; मुंबई-पुण्यात हजारो किलो मिठाई जप्त


पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे.

या धडक कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक प्रसिद्ध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त साठा तसेच बंदी असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे.

एफडीएच्या पथकांनी राज्यभरात कारवाई करत 30 लिटर दूध, तसेच 413.7 किलो दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाईचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत 15 लाख 58 हजार 72 रुपये इतकी आहे.

11 ते 14 सप्टेंबरदरम्यान राज्यातील 38 खाद्य आस्थापनांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी दूध, खवा, तूप, मिठाई यांसह 47 खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अंधेरी आणि मुलुंडमध्ये मिठाई व खवा जप्त

अंधेरी येथील आयुष मिल्क सप्लायरकडून 6 हजार 440 रुपये किमतीची 23 किलो बर्फी जप्त करण्यात आली. तर मुलुंड येथील ब्रिजवासी मिठाईयांकडून 60 हजार 300 रुपये किमतीचा 225 किलो खवा जप्त करण्यात आला.

प्रसिद्ध हॉटेल्स आणि डेअरींचे परवाने निलंबित

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या मुंबई आणि पुणे विभागातील अनेक नामांकित आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलाबा येथील प्रसिद्ध ‘कॅफे मोंडेगर’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

एफडीएच्या तपासणीत या कॅफेमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेसंदर्भात गंभीर त्रुटी आढळून आल्या. गरम पदार्थ 60 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर न ठेवणे, कोल्ड स्टोरेजमध्ये 5 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान न राखणे, ड्रेनेजची अपुरी व्यवस्था आणि उपकरणांची योग्य स्वच्छता न करणे, अशा त्रुटी तपासणीत समोर आल्या.

खार येथील रुहाफजा बेकरी व गुलशन डेअरी फार्म, अंधेरीतील चंद्रूज प्युअर घी स्वीट्स व शर्मा डेअरी अँड फास्ट फूड, ग्रँट रोड येथील पंजाबी चंदू हलवाई एलएलपी, विलेपार्लेतील श्री नारायण डेअरी, घाटकोपरमधील त्रिभुवन डेअरी फार्म व महावीर कॅश्यू अँड फूड्स, कांदिवलीतील महाराष्ट्र बिर्याणी सेंटर तसेच जोगेश्वरीतील अग्रवाल स्वीट मार्ट यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

कांजूरमार्ग येथील कृष्णा स्वीट्स अँड स्नॅक्सला 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पुण्यातील ‘पुरमचंद अँड सन्स’ येथे कालबाह्य खाद्यपदार्थ आढळून आल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच कोल्हापूर येथील ‘हॉटेल मल्हार वाड्या’वरही परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

जालना आणि बीडमध्ये गुटख्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाने जालना आणि बीड जिल्ह्यांत बंदी असलेल्या गुटख्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. जालन्यात तब्बल 95 लाख 30 हजार 464 रुपयांचा गुटखा आणि इतर प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच वाहतुकीसाठी वापरलेली 40 लाख रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली. त्यामुळे या कारवाईत एकूण 1 कोटी 35 लाख 30 हजार 464 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीडमध्येही 3 लाख 63 हजार 600 रुपयांचा गुटखा आणि 7 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे.

गणेश मंडळांसाठी जनजागृती; FDA चा इशारा

केवळ कारवाईवर न थांबता एफडीएकडून गणेशोत्सवाच्या काळात महाप्रसाद आणि भंडाऱ्यातून विषबाधा होऊ नये, यासाठी जनजागृतीही करण्यात आली आहे. मुंबईत 320 गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसाठी 5 विशेष कार्यशाळा घेण्यात आल्या.

तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सहकार्याने मोदक तयार करणाऱ्या 110 महिला बचत गटांना स्वच्छता आणि अन्न सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भंडाऱ्यासाठी केवळ परवानाधारक किंवा नोंदणीकृत आस्थापनांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!