मुस्लीम कुटुंबाच्या घरी गेल्या ८ वर्षांपासून गणरायाची आराधना; मकबूल माळगीमनींच्या अनोख्या भक्तीने दिला सामाजिक सलोख्याचा संदेश

सिंधुदुर्ग : धर्म आणि जातीच्या नावावरून मतभेदाच्या घटना समोर येत असताना सिंधुदुर्ग-गोवा सीमेवरील कोरगावमध्ये सामाजिक सलोख्याचं अनोखं उदाहरण पाहायला मिळत आहे. येथील रहिवासी मकबूल माळगीमनी यांच्या घरी यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं असून, गेल्या आठ वर्षांपासून ते भक्तिभावाने गणरायाची प्रतिष्ठापना करत आहेत. पूजा, आरती आणि नैवेद्य करत त्यांच्या घरी गणेशोत्सवाची ही परंपरा दरवर्षी सुरू आहे.
मकबूल यांना लहानपणापासूनच आपल्या घरी गणपती बसवण्याची इच्छा होती. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. घरात वीज नसताना चर्चमधील मेणबत्त्यांचं मेण आणून त्यापासून मेणबत्त्या तयार केल्याची आठवण ते सांगतात. घरात जेवणासाठी शिधा नसताना मंदिर आणि भंडाऱ्यातून मिळणारं जेवण घरी आणल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या काळात मदत करणाऱ्या कुणीही आपला धर्म किंवा जात विचारली नाही, यामुळे माणुसकीची भावना त्यांच्या मनात अधिक दृढ झाली.

लहानपणी गणपती बाप्पा घरी बसवण्याची इच्छा त्यांनी वडिलांकडे व्यक्त केली होती. त्यावेळी वडिलांनी स्वतःचं घर घेतल्यानंतर गणपती बसवण्याचा सल्ला दिला. पुढे मकबूल यांनी स्वतःचं घर उभारल्यानंतर बालपणीचं हे स्वप्न पूर्ण केलं. तेव्हापासून गेली आठ वर्षं त्यांच्या घरी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली जात आहे.


गणेशोत्सवाबाबत बोलताना मकबूल म्हणतात की, देव वेगवेगळे असले तरी माणुसकी एकच आहे. आपल्या श्रद्धेमुळे आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो, मात्र प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर करण्यासोबतच दुसऱ्याच्या धर्माचाही सन्मान केला पाहिजे, असं ते सांगतात. “माणूस आधी आला, नंतर धर्म आले,” अशी त्यांची भावना आहे.
विशेष म्हणजे, आपण प्रत्येकाने घरी गणपती बसवावा असा आपला आग्रह नसल्याचंही मकबूल स्पष्ट करतात. मात्र, धर्माच्या आधारावर भेदभाव न करता एकमेकांच्या श्रद्धांचा आदर करण्याचा संदेश ते देतात. त्यांच्या घरातील गणरायाचं आगमन त्यामुळे केवळ एका कुटुंबाचा उत्सव राहिलेला नाही, तर कोकणातील सामाजिक ऐक्य, सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीची जपणूक करणाऱ्या परंपरेचं उदाहरण ठरत आहे.