जनता दरबारात अचानक अस्वस्थ वाटलं अन् धनंजय मुंडे थेट रुग्णालयात दाखल..नेमकं काय घडलं?


परळी : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तब्येतीबाबत मंगळवारी महत्त्वाची माहिती समोर आली. दुपारी जनता दरबार सुरू असताना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना परळीतील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांची सोनोग्राफी केली असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंडे यांना नेमका कोणता त्रास झाला, याबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अचानक रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांत धनंजय मुंडे पुन्हा चर्चेत आले होते. त्यांनी समाजमाध्यमांवर व्यायाम करतानाची छायाचित्रे शेअर केली होती. या छायाचित्रांमध्ये त्यांचा नवा लूक दिसत होता. ‘नवा प्रवास सुरू होणार’ असा संदेशही त्यांनी या पोस्टसोबत दिला होता. त्यामुळे राजकीय अडचणींच्या काळानंतर मुंडे पुन्हा सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली होती.

मुंडे यांची राजकीय वाटचाल गेल्या काही काळात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठ्या वादात सापडली. या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आले. कराड हे परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्षही राहिले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये त्यांनी कृषिमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

मंत्रीपद गेल्यानंतर मुंडे काही काळ राजकीयदृष्ट्या अडगळीत गेल्याचे चित्र होते. मात्र, अलीकडे त्यांनी व्यायामाचे छायाचित्रे प्रसिद्ध करत स्वतःच्या संघर्षाची झलक देणाऱ्या कवितेच्या ओळी लिहिल्या. ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे’, ‘भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे’ तसेच ‘स्वतःशी सुद्धा लढतो आहे’ अशा आशयाच्या ओळी त्यांनी पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबतही चर्चा रंगली.

अशातच जनता दरबारात अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफी झाल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती असली, तरी पुढील वैद्यकीय तपासणीनंतर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!