दिशा सालियन प्रकरणात मोठा ट्विस्ट! सीबीआयच्या एफआयआरने पुन्हा खळबळ; 3 पानी गुन्हा, वडिलांचा 7 पानी जबाब अन् अनेक दिग्गजांची नावं चर्चेत


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा राजकीय आणि तपास यंत्रणांच्या वर्तुळात खळबळ उडवली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणात नव्याने एफआयआर दाखल केला आहे. या कारवाईपूर्वी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा सात पानी जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर तीन पानी एफआयआर दाखल करण्यात आला असून, या प्रकरणातील आरोप आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा नव्याने तपास सुरू झाला आहे. ताज्या वृत्तांनुसार एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरिया, रिया चक्रवर्ती आणि सूरज पांचोली यांच्यासह इतरांची नावे नमूद असल्याचे समोर आले आहे.

दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरात एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. दिशा ही अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक होती. दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत त्यावेळी मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मात्र, दिशाच्या कुटुंबीयांनी १६ जून २०२० रोजी या प्रकरणाचे राजकारण किंवा सनसनाटीकरण करू नये, असे आवाहन केले होते.

या प्रकरणाने पुढील काळात महाराष्ट्राच्या राजकारणातही मोठे वादळ निर्माण केले. २०२२ मध्ये विधानसभेत आमदार भरत गोगावले आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २०२३ रोजी नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांच्यावर आरोप करत तपासाची मागणी केली. सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. आदित्य ठाकरे यांच्या नार्को चाचणीची मागणीही त्यावेळी करण्यात आली होती.

दरम्यान, दिशा सालियनच्या मृत्यूबाबत पोलिसांनी यापूर्वी वेगळी भूमिका मांडली होती. जुलै २०२५ मध्ये न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिशा सालियनने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले होते. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे पुरावे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी २० मार्च २०२५ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत मुलीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून तपासाची मागणी केली.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने २ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाला नव्याने एफआयआर दाखल करून तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्याच आधारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एफआयआरची प्रत न्यायालयातही सादर केली जाणार आहे.

दिशाच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तिच्या हाताला, पायाला आणि छातीवरही जखमा असल्याची नोंद होती. डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद असून, नाक आणि तोंडातून रक्तस्राव झाल्याचाही उल्लेख आहे. त्याच अहवालात लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

आता नव्या एफआयआरमुळे या प्रकरणाचा तपास पुन्हा केंद्रस्थानी आला आहे. एफआयआरमध्ये गंभीर आरोपांचा समावेश असून, अनेक व्यक्तींची नावे तपासाच्या कक्षेत आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सीबीआय या सर्व आरोपांचा तपास कोणत्या दिशेने नेते, संबंधित व्यक्तींची चौकशी कशी होते आणि पुढील तपासातून नेमके कोणते पुरावे समोर येतात, याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!