अभिजीत दीपके पुन्हा आंदोलन करणार; फडणवीस सरकारविरोधात घेतला मोठा निर्णय..


मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर आता दीपके पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरणार आहेत. यावेळी त्यांच्या निशाण्यावर थेट राज्य सरकार आहे.

दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दीपके यांनी विविध मुद्द्यांवरून फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आता फडणवीस सरकारच्या विरोधात थेट आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) प्रसिद्धीपत्रक जारी करत या आंदोलनाची माहिती दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनात अभिजीत दीपके सहभागी होणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज येथील दीपके यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली होती.

दीपकेंचा अल्टिमेटम

पेपरफुटीच्या प्रकरणात एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सीजेपीने म्हटले आहे. येत्या 24 सप्टेंबरपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर विद्यार्थ्यांशी चर्चा करून राज्यव्यापी दौरा काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

यानंतर अभिजीत दीपके यांनी व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या सोबत असून, जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांचे राजीनामे होत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ठामपणे सहभागी राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

काय आहे प्रकरण?

एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आले. प्रथमेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणि त्याच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले.

या घटनेनंतर महाराष्ट्रभर संताप व्यक्त करण्यात आला. अभिजीत दीपके यांनी धाराशिव येथे जाऊन प्रथमेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

आता दीपके यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एमपीएससीच्या प्रश्नावर राज्य सरकारवरील दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!