आझाद मैदानाच्या आंदोलनाला परवानगी नाही; मनोज जरांगेंनी उपचार-पाणी सोडलं, आज 12 वाजता मोठी घोषणा?


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रविवारी आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी कालपासून सलाईन घेण्यासही नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शवली आहे. आंदोलनाला परवानगी नाकारल्याने जरांगे पाटील यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मध्यरात्री उपचार घेण्यासही नकार दिला. त्यानंतर आज, सोमवारी मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज, सोमवारी सतरावा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार आणि पाणी घेणे बंद केले आहे.

त्यानंतर जरांगे पाटील दुपारी 12 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अंतरवाली सराटीत रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक तपासणीसाठी गेले होते. मात्र, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांकडे दुसऱ्यांदा नव्याने परवानगीसाठी अर्ज केला आहे. परवानगी नाकारल्यास पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. दरम्यान, आज सोमवारी दुपारी 12 वाजता ते महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या आजच्या घोषणेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाटोद्यात जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाताना 15 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा शहरात पहिला मुक्काम करणार आहेत. काल पाटोदा शहरात पूर्वनियोजन बैठक पार पडली. त्यानंतर 80 एकर जागेवर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. तसेच 25 ठिकाणी पार्किंगसह अन्नछत्र उभारण्याचे काम सुरू आहे.

आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली असली तरी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधव मुंबईकडे जाण्यावर ठाम आहेत. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘जरांगे पाटलांनी थोडं थांबून आंदोलन केलं असतं’ – हसन मुश्रीफ

मनोज जरांगे पाटील यांनी सण-उत्सव लक्षात घेऊन काही काळ आंदोलन थांबवले असते, तर बरं झालं असतं, असं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू झाला असून त्यानंतर नवरात्रासह विविध सण-उत्सव आहेत. या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांसमोर असतो. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घेऊन जरांगे पाटील यांनी आंदोलन काही काळ थांबवले असते, तर बरं झालं असतं, असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!