मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर हायकोर्टाची मोठी अट; कोर्टाने स्पष्ट केलं काय?


मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाबाबत मुंबई हायकोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून किंवा आंदोलन करण्यापासून रोखता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, सण आणि उत्सवांच्या काळात आंदोलन करायचे असल्यास कायद्यानुसार रीतसर अर्ज करून आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असेल, अशी महत्त्वाची अट न्यायालयाने स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे यांनी मुंबईत उपोषण सुरू केल्यास त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्याची जबाबदारी सरकारची असेल, असेही कोर्टाने म्हटले आहे. कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मनोज जरांगे यांच्या संभाव्य मुंबई आंदोलनाविरोधात निलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षीच्या आंदोलनादरम्यान मुंबईतील निर्माण झालेल्या परिस्थितीचा दाखला देत यावेळी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

मुख्य न्यायमूर्ती महेश त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सध्याच्या परिस्थितीत मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यास नकार दिला.

हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्यापासून रोखता येणार नाही.
गेल्यावर्षीच्या घटनांचा दाखला देऊन यावेळी त्यांना रोखता येणार नाही.
ही लोकशाही आहे; एखाद्या व्यक्तीला उपोषण करू नका, असे सांगता येणार नाही.
जरांगेंच्या आंदोलनात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही.
मनोज जरांगे अद्याप मुंबईत आलेले नाहीत; सध्या त्यांच्या मुंबईतील आंदोलनाबाबत केवळ अंदाज व्यक्त केला जात आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.
केवळ कयासाच्या आधारावर न्यायालय आदेश देऊ शकत नाही.
सध्या न्यायालयाकडून संबंधितांना नोटिसा बजावता येतील.
या टप्प्यावर न्यायालय कोणतीही निरीक्षणे किंवा टिप्पणी करणार नाही.
मनोज जरांगे हे जबाबदार व्यक्ती असून आंदोलन करणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.
आज अंतरवालीत महत्त्वाची बैठक

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १५वा दिवस आहे. अंतरवाली सराटी येथे त्यांनी आज दुपारी १२ वाजता महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत ते मुंबईतील आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यातील मराठा समाजाला या बैठकीसाठी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मराठा समाजातील कुणबी नोंदी असलेल्या व्यक्तींना प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारे २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र आणि वैधता देऊन सातारा आणि कोल्हापूर गॅझेटिअर लागू करावे, यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली होती.

‘सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही’, अशी भूमिका घेत जरांगे यांनी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबई आंदोलनावर ते ठाम असून, राज्यातील मराठा समाजातील समर्थकांना अंतरवाली सराटी येथे दाखल होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे मुंबईकडे कधी कूच करणार आणि आंदोलनाची नेमकी तारीख काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!