गणेशोत्सवात प्रसाद-अन्नदानावर FDA ची नजर! गणेश मंडळांना नोंदणी बंधनकारक; नवी नियमावली जाहीर

पुणे : गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांकडून वाटप करण्यात येणारा प्रसाद आणि महाप्रसाद स्वच्छ व सुरक्षित असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार अन्नदान आणि प्रसादवाटप करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मंडळांच्या सोयीसाठी ही नोंदणी १२ महिने, तीन महिने किंवा केवळ गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीसाठी घेता येणार आहे. तीन महिने आणि दहा दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

प्रसादाच्या दर्जावर विशेष पथकांची नजर
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत गणेश मंडळांकडून होणाऱ्या अन्नदान आणि महाप्रसादाच्या दर्जावर एफडीएकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. यासाठी एफडीएच्या पुणे विभागाकडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.


ही पथके प्रत्यक्ष गणेश मंडळांना भेटी देऊन अन्नाचा दर्जा, स्वच्छता तसेच अन्न तयार करताना आणि वाटप करताना आवश्यक नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची पाहणी करणार आहेत. अन्न तयार करताना अस्वच्छता किंवा घाणीचे प्रकार आढळल्यास संबंधित मंडळावर एफडीएकडून कारवाई केली जाणार आहे.
१०० रुपयांत नोंदणीची सुविधा
अन्नदान करणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला एफडीएकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. मंडळांच्या सोयीसाठी १२ महिने, तीन महिने किंवा दहा दिवस अशा कालावधीसाठी नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये तीन महिने आणि दहा दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे, अशी माहिती एफडीएचे सह आयुक्त दिगंबर भोगावडे यांनी दिली.
नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन
एफडीएने नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. अन्नदान किंवा प्रसादवाटप करणाऱ्या गणेश मंडळांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरून वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी अधिकृत लिंक: https://foscos.fssai.gov.in/apply-for-lic-and-reg
गणेशोत्सव काळात भाविकांना देण्यात येणारा प्रसाद आणि अन्न स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार राहावे, यासाठी एफडीएकडून पुढील दहा दिवस विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.