पुणेकरांनो छत्र्या तयार ठेवा! ‘या’ तारखेपासून जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला असून तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, आता पुण्याच्या हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे.
येत्या २ ते ३ दिवसांत दुपारनंतर आकाश ढगाळ होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रविवारपासून (१३ सप्टेंबर) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विकेंडला घराबाहेर पडताना छत्री सोबत ठेवणे फायदेशीर ठरणार आहे.

इंदापूर आणि बारामतीमध्ये उकाडा वाढला
गेल्या २४ तासांत पुणे जिल्ह्यात संमिश्र हवामान पाहायला मिळाले. ग्रामीण भागात उकाडा आणि तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद इंदापूरमध्ये झाली. त्यापाठोपाठ बारामतीत ३३.२ अंश, तर दौंडमध्ये ३२.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.


पुणे शहरातील शिवाजीनगर आणि पाषाण येथे ३०.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
शनिवारपर्यंत पुण्यात कसे असेल हवामान?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारपर्यंत (१२ सप्टेंबर) पुणे शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शहरातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरीही कोसळू शकतात. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पूर्वतयारी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातही पावसाचे वातावरण तयार होणार
दरम्यान, ऑगस्टनंतर सप्टेंबर महिन्यातही राज्यातील अनेक भागांत पावसाची तूट जाणवत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशातच हवामान विभागाकडून दिलासादायक अंदाज समोर आला आहे.
पुढील २ दिवसांत राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता असून अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.