सोन्याच्या भावाला मोठा धक्का! उच्चांकापेक्षा ५० हजारांनी कमी दर; आता सोने खरेदी करावं का?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत असून, ९ सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव १६६ रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १ लाख ५२ हजार ४१३ रुपयांवर पोहोचला.
दरम्यान, चांदीचा भाव प्रति किलो २ लाख ३९ हजार ४२७ रुपये इतका नोंदवला गेला. काही महिन्यांपूर्वी सोन्याच्या दराने २ लाख रुपयांच्या आसपासची पातळी गाठली होती. मात्र, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध घडामोडींमुळे सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील व्याजदरांबाबतचे अंदाज आणि जागतिक बाजारातील परिस्थिती याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. मध्य पूर्वेतील तणाव वाढल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. याच काळात सोन्याच्या दरातही हालचाली पाहायला मिळत आहेत.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देशातील नागरिकांना गरज नसल्यास सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. सोन्याच्या दरातील अलीकडील घसरणीनंतर बाजारात खरेदीसाठी पुन्हा उत्सुकता वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्या-चांदीच्या दरांची दिशा काय राहणार, याकडे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.