तुकाराम मुंढेंच्या निर्णयावरून वाद पेटला! मंदिर महासंघ आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; प्रकरण काय?


मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. दूध आणि खाद्यपदार्थांपासून विविध ब्रँडच्या उत्पादनांपर्यंत तपासणी आणि कारवाई सुरू असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आता FDA च्या आणखी एका निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.

गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या भंडारा, अन्नदान आणि महाप्रसादाबाबत FDA कडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. अन्नाची सुरक्षितता, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे नियम असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या नियमांवरून आता वाद निर्माण झाला आहे.

नागपूरमधील महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांवर व्यावसायिक खाद्यविक्रीप्रमाणे नियम लागू करू नयेत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. या निर्णयामुळे तुकाराम मुंढे यांच्यावर पक्षपातीपणाचे आरोपही करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी FDA च्या नियमांविरोधात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यामार्फत ही तक्रार सादर करण्यात आली आहे.

मंदिरांमध्ये भक्तांच्या देणग्या आणि सेवाभावातून महाप्रसाद तयार केला जातो. त्यामुळे हॉटेल किंवा व्यावसायिक खाद्यविक्रीच्या ठिकाणी लागू होणारे नियम धार्मिक सेवाभावी उपक्रमांना त्याच पद्धतीने लागू करू नयेत, अशी मागणी विश्वस्तांनी केली आहे. अन्नाची स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास आपला विरोध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘सर्व धर्मांसाठी नियम समान असावेत’

FDA ची नियमावली सर्व धर्मांच्या सण-उत्सवांना समान पद्धतीने लागू करण्यात यावी, अशी मागणी मंदिर महासंघाने केली आहे. इतर धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या सार्वजनिक अन्नवितरणासाठीही समान नियम लागू केले जातात का, असा सवाल विश्वस्तांनी उपस्थित केला आहे.

FDA प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमांबाबत घेतलेल्या निर्णयाची फेरतपासणी करावी आणि या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि विविध मंदिरांच्या विश्वस्तांनी केली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या FDA कारवाईवरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!