कितीही संकटं आली… काहीही घडलं तरी… सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याची चर्चा

मुंबई : मुंबईवर कितीही संकटं आली, कितीही घटना घडल्या तरी शहराचं धावणं कधी थांबत नाही. मुंबई ना कुणापुढे झुकते, ना हार मानते. संकटांवर मात करत मुंबई नेहमी पुढे जात राहते, अशा शब्दांत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईच्या जिद्दीचं कौतुक केलं.
टाटा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांनी मुंबईच्या खास ‘स्पिरीट’चा उल्लेख केला. मुंबईची ओळख, तिचं वेगळेपण आणि शहराचं महत्त्व अधोरेखित करत त्यांनी टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंच्या जिद्दीचंही कौतुक केलं.

टाटा समूहाचं मुंबईच्या विकासात मोठं योगदान असल्याचं सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मुंबईची खासियत सर्वांनाच माहीत आहे. शहरात कितीही अडचणी आल्या तरी मुंबई थांबत नाही. ती सतत धावत राहते आणि पुढे जात राहते. हीच मुंबईची खरी ओळख आहे.


टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूच्या मनात एक स्वप्न असतं. प्रत्येक जण वेगवेगळ्या उद्देशाने या स्पर्धेत सहभागी होतो. कुणासाठी फिटनेस महत्त्वाचा असतो, तर कुणी स्वतःचं ध्येय पूर्ण करण्यासाठी धावतो. दिव्यांग सहभागीही मोठ्या उत्साहाने या स्पर्धेत भाग घेतात. प्रत्येक जण आपापल्या स्वप्नासाठी धावत असल्याचं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
फिटनेसबाबत सुनेत्रा पवारांचा कानमंत्र
यावेळी सुनेत्रा पवार यांनी फिटनेसच्या महत्त्वावरही भाष्य केलं. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. कोविडनंतर फिटनेस आणि आरोग्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. भारतीय संस्कृतीत योगाला अनादी काळापासून महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे फिट राहण्याचा प्रयत्न करावा आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असा संदेश त्यांनी दिला.
17 जानेवारी 2027 रोजी मुंबई मॅरेथॉन
दरम्यान, पुढील वर्षी मुंबईत टाटा मॅरेथॉनचे आयोजन 17 जानेवारी 2027 रोजी करण्यात येणार आहे. फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, ओपन, ड्रीम रन, सीनियर सिटीझन रन आणि चॅम्पियन्स विथ डिसॅबिलिटी अशा विविध प्रकारांमध्ये ही स्पर्धा पार पडते.
या स्पर्धेसाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून देशभरातून मोठ्या संख्येने धावपटू मुंबईत सहभागी होतात. याशिवाय परदेशातील धावपटूही या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत येतात. त्यामुळे टाटा मॅरेथॉन ही मुंबईच्या क्रीडा विश्वातील महत्त्वाची स्पर्धा मानली जाते.