एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देणार? “दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच शिल्लक राहणार नाही”; बड्या नेत्याचा मोठा दावा


ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या चर्चांना जोर आला आहे. एकनाथ शिंदे गटाने काही दिवसांपूर्वी भुसावळमध्ये शरद पवार गटाच्या ११ नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या गटाबाबतही मोठा दावा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत ठाकरे गटात मोठी फूट पडणार असल्याचे संकेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिले आहेत.

ठाण्यात दहीहंडी उत्सवाला भेटी देत असताना माध्यमांशी संवाद साधताना म्हस्के यांनी हा दावा केला. “राजकीय हंडी एकनाथ शिंदेंनी फार पूर्वीच फोडली आहे. आता आगामी फोडाफोडी काही दिवसांत कळेल. कोणीच शिल्लक राहणार नाही. ठराविक दोन व्यक्ती सोडल्या तर कोणीच शिल्लक राहणार नाही,” असं नरेश म्हस्के म्हणाले.

म्हस्के हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने ठाकरे गटातील नेमके कोणते आमदार किंवा नेते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, म्हस्के यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या या दाव्यामागे नेमकी कोणती राजकीय घडामोड आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

राज्यात आधीच फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. भुसावळमधील ११ नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर मुंबईच्या महापौरपदासाठीही एकनाथ शिंदे यांनी राजकीय तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. अशातच आता ठाकरे गटातील नेत्यांबाबत म्हस्केंनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापलं आहे.

दरम्यान, नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. तुरुंगात असताना आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय राऊत यांनी व्यक्त केल्याच्या वक्तव्यावर म्हस्के यांनी निशाणा साधला. राऊत प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी वक्तव्ये करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर चढून राजकीय हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही म्हस्केंनी केली.

संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या जवळ असल्याचं दाखवत असून राज्यसभेची संधी मिळावी, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा दावाही नरेश म्हस्के यांनी केला. त्यामुळे एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या संघर्षात आता पुढची राजकीय फूट कुठे पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

“काही दिवसांतच सगळं कळेल”, असं म्हस्के यांनी स्पष्ट केल्याने त्यांच्या दाव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आता ठाकरे गटाला नेमका कोणता धक्का बसणार आणि शिंदे गटात कोणाची एन्ट्री होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!