हंडी फुटली, पण आनंदाऐवजी दहीहंडीच्या जल्लोषात अचानक मातम! लोखंडी सांगाडा कोसळून महिलेचा मृत्यू


पिंपरी-चिंचवड : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लावणारी हृदयद्रावक घटना जुन्या सांगवीत घडली आहे. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यानंतर लोखंडी स्ट्रक्चर उतरवताना त्याचा अवजड भाग अचानक कोसळून ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांच्या डोक्यावर पडला. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रात्री सुमारे ११ वाजता ही दुर्घटना घडली. मंडळाचे कार्यकर्ते दहीहंडीसाठी उभारलेला लोखंडी सांगाडा खाली उतरवत होते. त्याचवेळी सांगाड्याचा एक जड भाग अचानक खाली पडला आणि तेथे उभ्या असलेल्या सलमा यांच्या डोक्यावर आदळला. काही क्षणांतच उत्सवाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण बदलून शोककळा पसरली.

या घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सलमा यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळात सक्रिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र, घटना गंभीर असल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्याची विनंती कुटुंबीयांना केली आहे. या घटनेने जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आज ५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबई आणि ठाण्यात लाखो रुपयांच्या बक्षिसांसाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगली आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंडी महोत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. टेंभी नाका दहीहंडीही आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. मुंबई-ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या असून विजेत्यांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिला गोविंदा पथकासाठीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

याचदरम्यान मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसे नेते गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीमध्ये अखिल मालपा डोंगरी-अंधेरी पूर्वच्या गोविंदा पथकाने पहिले ९ थर रचले. मात्र, ९वा थर उभारल्यानंतर खाली उतरताना एका गोविंदाचा तोल गेल्याचा थरारक प्रकारही समोर आला.

एकीकडे लाखोंच्या बक्षिसांसाठी गोविंदांचा थरार सुरू असताना, जुन्या सांगवीतील दुर्घटनेने दहीहंडीच्या आयोजनात सुरक्षिततेला किती महत्त्व आहे, हा गंभीर प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!