मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; बड्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी, मुख्यमंत्र्यांकडे थेट साकडे


मुंबई: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. सात दिवस उलटूनही अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने मराठा आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत. जरांगे यांच्या समर्थनार्थ राज्यातील विविध भागांत रास्तारोको, निदर्शने आणि आंदोलनं सुरू आहेत. काही जिल्ह्यांमध्ये बंदची हाकही देण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आता मोठी मागणी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. विखे पाटील यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे.

सकल मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी पत्रकार परिषद घेत ही मागणी केली. यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. विखे पाटील हे मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावा गायकर यांनी केला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी, मराठा विद्यार्थ्यांची वसतिगृहे तसेच SCBC आरक्षणाच्या मुद्द्यावर विखे पाटील यांनी पुरेशा बैठका घेतल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाशी संवाद साधला जात नाही, बैठका घेतल्या जात नाहीत आणि समाजासाठी नेमकं काय काम सुरू आहे, याची माहितीही दिली जात नाही, असा दावा गायकर यांनी केला.

त्यामुळे मराठा समाजाची दिशाभूल करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा, अशी मागणी करण गायकर यांनी केली.

8 सप्टेंबरला मुंबईत बैठक

SCBC आरक्षण टिकवण्यासाठीही ठोस प्रयत्न होत नसल्याचा दावा गायकर यांनी केला. येत्या 8 सप्टेंबरला मुंबईत मराठा समाजाची बैठक घेण्यात येणार असून, त्यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मनोज जरांगे पाटील आणि आमचा लढा एकच आहे. जरांगे पाटील मराठवाड्यातील मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढत आहेत; मात्र राज्यातील इतर भागांतही मराठा समाजाचे प्रश्न आहेत, असंही गायकर यांनी स्पष्ट केलं.

जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला

दरम्यान, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या वतीने काल जरांगे यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या अभ्यासकांच्या टीमसोबतही सुमारे तीन तास चर्चा झाली. जरांगे यांच्या प्रकृतीची परिस्थिती पाहता ते उपोषण स्थगित करतील, अशी सरकारला अपेक्षा होती. मात्र त्यांनी त्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

दोन दिवसांपूर्वी झालेल्या भेटीदरम्यान जरांगे यांनी पाणी आणि औषधोपचार घेण्याची मागणी मान्य केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मराठवाड्यात निर्माण झालेली अस्थिरता संपावी आणि त्यांनी सरकारच्या विनंतीचा विचार करावा, अशी अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली.

आज सकाळी जरांगे यांना निरोप पाठवण्यात आला असून, एक-दोन दिवसांत पुन्हा अभ्यासकांशी चर्चा करून सरकारने घेतलेले निर्णय कागदावर पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार सरकारकडून संबंधित निर्णय पुन्हा जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी कशी सोडवता येईल, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रसाद लाड यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!