मुलीसाठी आईस्क्रीम घ्यायला गेला अन् थेट आयसीयूत! दगडफेकीचा जाब विचारताच डोक्यात कात्री, नशेतल्या तिघांचा थरार


छत्रपती संभाजीनगर : कुटुंबासोबत साधारणपणे आईस्क्रीम आणि औषध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याने छत्रपती संभाजीनगर हादरले आहे. जयभवानीनगर परिसरात नशेत धिंगाणा घालणाऱ्या तिघांनी जितेश रमेश तुपशेंद्रे या ३४ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यावर धारदार कात्रीने वार करण्यात आला. कात्री डोक्यातच रुतल्याने जितेश गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. जितेश हे पत्नी अश्विनी आणि दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलीसोबत जयभवानीनगरातील जयभवानी जनरिक मेडिकल स्टोअर्समध्ये गेले होते. औषध आणि मुलीसाठी आईस्क्रीम घेत असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दिशेने काही तरुणांकडून दगडफेक सुरू होती. त्यातील एक दगड जितेश यांच्या पत्नी आणि मुलीच्या अगदी जवळ पडला. त्यामुळे त्यांनी संबंधित तरुणांना दगडफेक का करत आहात, असा जाब विचारला.

याचा राग आल्याने तिघांनी जितेश यांच्याशी वाद घालत शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांना मारहाण करत धमकी देण्यात आली. याचवेळी एका आरोपीने लक्ष्मण साळुंके याला कात्री आणून जितेश यांच्या डोक्यात मारण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर लक्ष्मणने धारदार कात्रीने जितेश यांच्या डोक्याच्या माथ्यावर जोरदार वार केला. कात्री डोक्यात खोलवर रुतल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले.

हल्ल्यादरम्यान रोहित ऊर्फ पिल्ल्या बोराडे याने जितेश यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाचा चावा घेतला. सचिन बोडखे यानेही त्यांना मारहाण केली. पतीवर हल्ला होत असल्याचे पाहून पत्नीने आरडाओरड करत मदतीसाठी आवाज दिला. आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. नागरिकांची गर्दी होताच तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गंभीर अवस्थेत जितेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांच्या डोक्यात रुतलेली कात्री बाहेर काढली. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी रोहित ऊर्फ पिल्ल्या भाऊलाल बोराडे, सचिन गणेश बोडखे आणि लक्ष्मण परमेश्वर साळुंके या तिघांना अटक केली आहे.

कुटुंबासोबत बाहेर पडलेल्या तरुणाने पत्नी आणि चिमुकल्या मुलीच्या सुरक्षेसाठी दगडफेकीचा जाब विचारला; मात्र त्यानंतर त्याच्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने या घटनेने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे जयभवानीनगरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!