स्पाच्या नावाखाली सुरू होता नको तो धंदा; पुणे-ठाण्यातील तरुणींची सुटका, मोठे जाळे उघड


नांदेड : नांदेड येथील एका स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहव्यापार व्यवसायाच्या जाळ्यातून सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

‘वेलनेस स्पा सेंटर’मध्ये मसाज सेंटरच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून, तीन पुरुषांना अटक करण्यात आली आहे.

कारवाईपूर्वी पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये डमी ग्राहक पाठवून परिस्थितीची खातरजमा केली. त्यानंतर मिळालेल्या इशाऱ्यानुसार पोलिसांच्या पथकाने तातडीने छापा टाकला. या छाप्यात नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे आणि पुणे येथील सात महिला आढळून आल्या. त्यांना मसाजच्या कामाच्या नावाखाली आणून कथितरित्या अवैध व्यवसायात सहभागी केले जात असल्याचे तपासात समोर आले.

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणात पोलिसांनी आसाममधील हीफझुर रहेमान, रहाज उद्दिन आणि याहीया अहेमद या तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

दरम्यान, स्पा सेंटरचा मालक संतोष बघे हा अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमासह इतर संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

सुटका केलेल्या महिलांची चौकशी सुरू

पोलिसांकडून सुटका करण्यात आलेल्या सात महिलांची चौकशी केली जात आहे. त्यांना नेमके कशाप्रकारे या व्यवसायात आणण्यात आले, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे.

स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!