म्हाडाच्या घरांसाठी आता लॉटरीचा ‘टेंशन’ नाही! रिकामे फ्लॅट थेट भाड्याने मिळणार; ८००+ घरांपासून सुरुवात, दिवाळीपूर्वी ऑनलाइन पोर्टल सुरू

मुंबई : मुंबईत परवडणाऱ्या घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी म्हाडाने मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या विविध मंडळांच्या सोडतीत विक्रीविना शिल्लक राहिलेली घरे आता भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे लॉटरीमध्ये घर मिळण्याची प्रतीक्षा न करता पात्र नागरिकांना म्हाडाची घरे भाड्याने घेण्याचा मार्ग खुला होणार आहे.
विविध प्रकल्पांमध्ये घरांच्या किमती, स्थान किंवा इतर कारणांमुळे अनेक सदनिका विकल्या जात नाहीत. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ योजनेनंतरही घरे शिल्लक राहत असल्याने म्हाडाचा मोठा महसूल अडकून पडतो. त्यामुळे केवळ विक्रीवर अवलंबून न राहता या घरांचा भाडेतत्त्वावर वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विरार-बोळींजमध्येच ८०० हून अधिक घरे सध्या विक्रीविना रिक्त असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई आणि पुणे मंडळातील अनेक घरांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आता या रिक्त घरांना भाड्याने देऊन महसूल निर्माण करण्यासोबतच नागरिकांना परवडणाऱ्या निवासाची सुविधा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे.


दिवाळीपूर्वी येणार म्हाडाचे खास पोर्टल
राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणानुसार म्हाडाने भाडेतत्त्वावरील घरांसाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. या योजनेची अंमलबजावणी सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल विकसित केले जात आहे. या पोर्टलची निर्मिती करण्याचे कंत्राट **टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)**ला देण्यात आले असून, दिवाळीपूर्वी म्हणजेच येत्या दोन महिन्यांत पोर्टल कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
महामुंबईत सध्या सुमारे २५ टक्के कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात. रोजगार, शिक्षण, पर्यटन आणि उद्योगांच्या निमित्ताने भविष्यात मुंबई महानगर प्रदेशात लोकसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाड्याच्या घरांची वाढती गरज लक्षात घेऊन सरकारने नव्या गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य दिले आहे.
एजंटची गरज नाही; घरभाड्याची प्रक्रिया ऑनलाइन
म्हाडाच्या प्रस्तावित पोर्टलवर घरांची माहिती, भाडेकरार, पोलीस पडताळणी, मुद्रांक शुल्क, देखभाल आणि व्यवस्थापनासह विविध सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नाममात्र सेवा शुल्क भरून नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करता येणार असल्याने एजंटच्या माध्यमातून घर शोधण्याची गरज कमी होणार आहे.
यापुढे म्हाडाच्या नव्या प्रकल्पांमध्ये थेट भाड्यासाठी घरे बांधण्यावरही भर दिला जाणार आहे. त्यामुळे रिक्त घरांचा प्रश्न सुटण्यासोबतच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात म्हाडाचे घर भाड्याने मिळण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.