अजित दादांनी याला कुत्र्याची उपमा दिलेली, त्यामुळे आम्हाला…; सुप्रिया सुळेंच्या मुद्द्यावरून उमेश पाटलांना रमेश कदमांचा थेट इशारा!

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आता सोलापूरच्या मोहोळपर्यंत पोहोचला आहे. अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर टीका केल्यानंतर मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, कदम यांनी टीका करताना अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी उमेश पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा थेट संदर्भ दिला आहे.
नेमका वाद कुठून सुरू झाला?

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकच असल्याची भूमिका मांडली होती. पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली असून, पक्ष त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने काढून घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले होते. ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू असल्याचंही सुळे यांनी सांगितलं.


यानंतर उमेश पाटील यांनी सोशल मीडियावरून सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिलं. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आहेत, हे ऐतिहासिक सत्य असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र, ‘संस्थापक असणे’ आणि ‘पक्षाचा कायमस्वरूपी मालक असणे’ या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचा दावा पाटील यांनी केला. राजकीय पक्ष ही कोणत्याही एका व्यक्तीची खासगी मालमत्ता नसते, तर पक्षाची घटना, सदस्य, संघटनात्मक रचना आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार पक्ष चालतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यांची ही पोस्ट काही तासांतच हटवण्यात आल्यानेही राजकीय चर्चेला उधाण आलं.
रमेश कदमांचा उमेश पाटलांवर थेट हल्लाबोल
उमेश पाटील यांच्या भूमिकेवर रमेश कदम यांनी आक्षेप घेत त्यांच्या राजकीय अनुभवावर आणि क्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले. उमेश पाटील यांनी कोणत्या नेत्यावर टीका करत आहोत, याचं भान ठेवावं, असा टोला कदम यांनी लगावला. जिल्हा परिषदेची निवडणूकही जिंकता आली नाही, असा दावा करत त्यांनी पाटील यांना राजकीय परिपक्वता नसल्याची टीका केली. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशी वक्तव्यं करू नयेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘अजितदादांनीच कुत्र्याची उपमा दिली होती…’
रमेश कदम यांच्या वक्तव्यातील सर्वाधिक चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे अजित पवारांचा उल्लेख. “स्वतः अजितदादांनी याला कुत्र्याची उपमा दिली होती, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका,” असं म्हणत कदम यांनी उमेश पाटील यांना इशारा दिला. मोहोळमध्ये उमेश पाटील यांच्याबाबत आपल्याला माहिती असलेल्या काही गोष्टी उघड करण्याची वेळ आणू नका, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
अजित पवार यांनी 2024 मध्ये मोहोळमधील एका राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांच्यावर टीका करताना ‘कुत्र्याला वाटतं मी बैलगाडी ओढतोय’ असा उल्लेख केला होता. त्यावेळी उमेश पाटील यांनीही अजित पवारांच्या वक्तव्याला उत्तर देत आपण त्यांचा दौरा रद्द करायला लावल्याचं कधी म्हटलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. या जुन्या वादाचा संदर्भ आता रमेश कदमांनी पुन्हा पुढे आणला आहे.
‘ज्या भाषेत बोलाल, त्याच भाषेत उत्तर देऊ’
रमेश कदम यांनी राजकीय मतभेद असणं स्वाभाविक असल्याचं म्हटलं. मात्र, टीका करताना राजकीय मर्यादा पाळल्या पाहिजेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “ज्या भाषेत तुम्ही टीका कराल, त्या भाषेत आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी उमेश पाटील यांना दिला.
दरम्यान, रमेश कदम आणि उमेश पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष याआधीही समोर आला आहे. 2025 मध्ये कदम यांनी अजित पवारांची भेट घेऊन उमेश पाटील यांच्याविरोधात तक्रार केली होती. अजित पवारांशी असलेल्या संबंधांचा पाटील गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक जिंकून दाखवण्याचं खुलं आव्हानही दिलं होतं.
आता सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यापासून सुरू झालेल्या या वादात अजित पवारांच्या जुन्या वक्तव्याचा दाखला देत रमेश कदमांनी उमेश पाटील यांना लक्ष्य केल्याने मोहोळसह सोलापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या टीकेला उमेश पाटील काय उत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.