पुणे हादरलं! सोबत झोपायला गेले अन् बेडरूममध्येच भयंकर प्रकार; पत्नीची हत्या, मुलावरही हल्ला, बहीण ठरली कारण

पुणे : बहिणीशी बोलत नसल्याच्या किरकोळ कारणावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर परिसरात घडली आहे. यानंतर आईला वाचवण्यासाठी धावलेल्या १७ वर्षीय मुलावरही आरोपीने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
राजगुरुनगर येथील वाडा रोड परिसरातील ‘संगम गार्डन’ इमारतीत रविवारी (३० ऑगस्ट) रात्री साडेनऊ ते साडेअकराच्या दरम्यान ही घटना घडली. आरोपी महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५, मूळ रा. कनेरसर, ता. खेड) याचे पत्नी दिपा दौंडकर (वय ४०) यांच्यासोबत बहिणीशी बोलण्यावरून वाद झाला होता.

‘माझ्या बहिणीशी तू का बोलत नाहीस?’ या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने पत्नीवर हल्ला केला. या घटनेत दिपा दौंडकर यांचा मृत्यू झाला.


दरम्यान, आई काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व बेडरूममध्ये गेला. त्यावेळी त्याला आईसोबत घडलेला प्रकार समोर आला.
आपला गुन्हा उघडकीस येईल या भीतीने आरोपीने मुलालाही इजा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मुलाने आरडाओरड करत घराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्याला धमकी देत चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत मुलाच्या हाताला दुखापत झाली आहे.
या प्रकरणी जखमी मुलगा अथर्व दौंडकर याने दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी आरोपी महेंद्र दौंडकर याच्याविरोधात पत्नीच्या हत्येसह मुलावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेने राजगुरुनगर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.