लग्न मोडलं, ७ वर्षांचा मुलगा पदरी; सोशल मीडिया स्टारला दोघांनी झाडाला बांधून जिवंत जाळलं; लिव्ह-इन रिलेशनशिपमुळे हत्येचं गूढ?

चंदीगड : एका प्रसिद्ध २८ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मंजीत कौर असं मृत तरुणीचं नाव आहे. आठ आठवड्यांपूर्वी दोन ओळखीच्या व्यक्तींनी तिचं अपहरण करून तिला झाडाला बांधून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
या घटनेत मंजीत गंभीररित्या भाजली होती. तिच्यावर चंदीगडमधील ‘पोस्टग्रेजुएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च’ (PGIMER) येथे उपचार सुरू होते. ती मृत्यूशी झुंज देत असताना २६ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत मालवली. आता या हत्याकांडामागे लिव्ह-इन रिलेशनशिपचं कारण असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

भेटायला बोलावलं अन् अपहरण केल्याचा आरोप
मृत मंजीत कौर यांच्या आई कांता देवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ जुलैच्या रात्री शुबी आणि पिंडा या दोन संशयितांनी मंजीतला सेक्टर-३४ परिसरातील एका दारूच्या दुकानाजवळ भेटण्यासाठी बोलावलं होतं. मंजीत तेथे पोहोचल्यानंतर दोघांनी तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि मोरिंडा येथे नेल्याचा आरोप आहे.


मोरिंडा येथे नेल्यानंतर आरोपींनी आधी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका झाडाला बांधून तिला पेटवून दिले. सुदैवाने, एका ओळखीच्या व्यक्तीने तिला आगीच्या विळख्यात पाहिले आणि तत्काळ घोंगड्याच्या मदतीने आग विझवून तिला मोरिंडाच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने तिला प्रथम मोहाली आणि त्यानंतर ९ जुलै रोजी चंदीगडच्या ‘पीजीआयएमईआर’ (PGIMER) रुग्णालयात हलवण्यात आलं.
शुद्धीवर आल्यानंतर कुटुंबीयांना सांगितली आपबीती
पैशांच्या व्यवहारातून किंवा वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. रुग्णालयात कित्येक आठवडे मंजीत बेशुद्ध अवस्थेत होती. ५ ऑगस्ट रोजी तिला काही काळासाठी शुद्ध आली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला हा अमानुष प्रकार कुटुंबीयांना सांगितला. परंतु, त्यानंतर तिची प्रकृती पुन्हा खालावत गेली. शरीराचा मोठा भाग गंभीररीत्या भाजल्यामुळे अखेर २६ ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
आरोपींविरोधात गंभीर कलमांनुसार गुन्हा
मंजीतच्या मृत्यूनंतर सेक्टर-३४ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १४०(१) (अपहरण), १०३(१) (हत्या) आणि ३(५) (समान गुन्हेगारी उद्देश) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंजीत घटस्फोटित होती आणि तिला सात वर्षांचा मुलगा आहे. तसेच तिचे एका आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या नात्याचा या हल्ल्यामागे काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.
मुख्य आरोपींचा शोध सुरू
सध्या सेक्टर-३४ पोलिसांचं पथक शुबी आणि पिंडा या दोन्ही संशयित आरोपींचा शोध घेत आहे. चंदीगड ते मोरिंडा मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात असून, मंजीतच्या नातेवाईक आणि मित्रांचीही चौकशी केली जात आहे. या हल्ल्यामागील नेमकं कारण काय होतं आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.