शिक्षक होण्याचं स्वप्न आता वयामुळे अडणार नाही! नववी ते बारावीच्या भरतीबाबत शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

पुणे : शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील नववी ते बारावीच्या शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वयाच्या अटीमुळे आतापर्यंत संधीपासून दूर राहिलेल्या पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षण आयुक्तांच्या परिपत्रकानुसार, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना केवळ वय अधिक असल्यामुळे अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या अनुभवी उमेदवारांसाठीही संधी खुली झाली आहे.

दरम्यान, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२च्या आधारे शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. ज्या संस्थांना मुलाखतीशिवाय पदनिश्चितीचा पर्याय देण्यात आला आहे, तिथे ही प्रक्रिया सुरू आहे.


उमेदवारांना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्रांसह जात प्रमाणपत्र, जात वैधता, दिव्यांग तसेच समांतर आरक्षणाशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. मूळ कागदपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.
२ ते ७ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी होणार असून, त्यानंतर ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान पदस्थापनेचं समुपदेशन होणार आहे. पडताळणीनंतर पात्र उमेदवारांची पोलीस चारित्र्य पडताळणी आणि नियमानुसार वैद्यकीय तपासणी केली जाईल.
दरम्यान, पहिली ते पाचवीसाठी टीईटी किंवा सीटीईटी पेपर-१, तर सहावी ते आठवीसाठी संबंधित विषयाचा पेपर-२ आवश्यक आहे. नववी ते बारावीच्या पदांसाठी संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता पूर्ण करणे बंधनकारक आहे.
म्हणजेच वयाची अट हटली असली तरी पात्रतेच्या निकषांमध्ये कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे आणि पात्रता तपासून ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.