थेऊर फाट्यावर पोलिसांचा दणका! १९ वर्षीय तरुणाला गांजासह रंगेहात पकडलं; १.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर, ता. २९ : थेऊर फाट्याजवळील रेल्वे उड्डाणपुल परिसरात गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला लोणी काळभोर पोलिसांनी रंगेहात पकडले. रोहन लक्ष्मण थोरात (वय १९, रा. माळीमळा, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून १ हजार १४४ ग्रॅम वजनाचा, सुमारे ५५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (ता. २८) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास थेऊर फाट्याजवळील रेल्वे उड्डाणपुल परिसरात रोहन थोरात हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्याने हा गांजा सतिष ऊर्फ सत्या विठ्ठल चव्हाण (रा. धुमाळ मळा, लोणी काळभोर) याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले.

गांजा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी रोहन थोरात याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


या कारवाईत गांजासह ५० हजार रुपये किमतीची सुझुकी ॲक्सेस मोपेड क्रमांक एमएच १२ एक्सझेड२५४४ आणि १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई सागर गणपत धायतोंडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव करत आहेत.