“साहेब, बायकोने मला रात्रीचा भात खायला दिला”; तुकाराम मुंढेंसमोर आला अजब प्रकार

पुणे : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) ऑनलाइन तक्रार प्रणालीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत एफडीएच्या पोर्टलवर तब्बल 7 हजार 5 तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अन्न आणि औषधांशी संबंधित गंभीर तक्रारींसोबतच काही भन्नाट आणि घरगुती स्वरूपाच्या तक्रारींचाही समावेश आहे.
ऑनलाइन तक्रार प्रणाली सुरू झाल्यामुळे नागरिकांना अन्न सुरक्षा आणि औषध सुरक्षेशी संबंधित तक्रारी थेट पोर्टलवर नोंदवता येत आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर तिची सद्यस्थिती तपासण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दोन महिन्यांत 7 हजारांहून अधिक तक्रारी
गेल्या दोन महिन्यांत एफडीएच्या पोर्टलवर 7,005 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 2,809 तक्रारींची चौकशी पूर्ण करून त्या निकाली काढण्यात आल्या आहेत.


मात्र, या तक्रारींमध्ये काही तक्रारींनी अधिकाऱ्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. ‘बायकोने रात्रीचा शिळा भात सकाळच्या नाश्त्याला दिला’ किंवा ‘घराच्या जवळ दारूचं दुकान आहे’ अशा स्वरूपाच्या घरगुती तक्रारीही पोर्टलवर दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
एफडीएच्या कारवायांमुळे चर्चेला उधाण
दरम्यान, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे अन्न आणि औषध प्रशासन पुन्हा चर्चेत आलं आहे. ऑनलाइन तक्रार प्रणालीमुळे नागरिकांना थेट प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध झाला असून, तक्रारींची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.
पुण्यात सिप्लाविरोधात मोठी कारवाई
दरम्यान, एफडीएने पुण्यातही मोठी कारवाई केली आहे. सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातील कॅरी अँड फॉरवर्डिंग (C&F) युनिटचा औषध विक्री परवाना रद्द करण्यात आला आहे.
वाडकी येथील कंपनीच्या मुख्य वेअरहाऊसमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत रिएक्टिन प्लस टॅब्लेट्सच्या साठवणूक, पॅकेजिंग आणि बाजारातून औषध परत मागवण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.