पुणे महापालिका भरतीत ‘मुन्नाभाई’गिरीचा पर्दाफाश! कॅमेरायुक्त चष्म्याने प्रश्नपत्रिका स्कॅन, २० हजार लॉगशिट तपासल्यानंतर तीन उमेदवार रडारवर


छत्रपती संभाजीनगर : पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती परीक्षेत कॉपी करण्यासाठी थेट तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅमेरा बसवलेल्या चष्म्याच्या मदतीने प्रश्नपत्रिका स्कॅन करून ती बाहेर पाठविल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या परीक्षा लॉगशिटच्या तांत्रिक तपासणीत या गैरप्रकाराचा माग काढण्यात आला. या प्रकरणी तीन उमेदवारांसह पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे महापालिकेने कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या परीक्षेसाठी राज्यभरातून ४२ हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २० हजार ९३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. जूनमध्ये निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू असतानाच काही उमेदवारांच्या परीक्षा पद्धतीबाबत संशय निर्माण झाला.

शेवटच्या अर्ध्या तासात अचानक वेग वाढला

महापालिकेने सर्व उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशिटची तांत्रिक तपासणी केली. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा येथील आयकॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रावरील तीन उमेदवारांची परीक्षा देण्याची पद्धत असामान्य असल्याचे आढळले. हे उमेदवार परीक्षेच्या पहिल्या अर्ध्या तासात प्रामुख्याने प्रश्न वाचत होते. त्यानंतर ते स्वच्छतागृहात गेले आणि परतल्यानंतर त्यांच्या प्रश्न सोडविण्याच्या वेगात अचानक मोठी वाढ झाली.

परीक्षेच्या शेवटच्या ३० मिनिटांत तब्बल १०० प्रश्न सोडविण्यात आले, त्यापैकी ९० पेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे अचूक असल्याचे लॉगशिटच्या तपासणीत दिसून आले. एवढ्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने प्रश्न सोडविणे आणि त्यातील बहुतांश उत्तरे अचूक येणे यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचा संशय आणखी गडद झाला.

माउस न वापरताच प्रश्नांची उत्तरे?

तांत्रिक तपासणीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली. संबंधित उमेदवार प्रश्न सोडवत असताना माउसचा वापर केल्याचे अपेक्षित लॉग आढळले नाहीत. त्यामुळे परीक्षा केंद्रातील त्यांच्या हालचाली, लॉगशिट आणि इतर उपलब्ध माहितीचा सखोल तपास करण्यात आला.

यातून कॅमेरा असलेल्या विशेष चष्म्यासारख्या उपकरणाचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील मजकूर स्कॅन करण्यात आला असावा आणि तो बाहेरील व्यक्तीपर्यंत पाठविण्यात आला असावा, अशी शक्यता तपासात पुढे आली.

२० हजारांहून अधिक लॉगशिटची छाननी

या गैरप्रकाराचा शोध घेण्यासाठी महापालिकेने जवळपास दीड महिन्यापासून तांत्रिक तपास सुरू ठेवला होता. परीक्षा दिलेल्या २० हजार ९३५ उमेदवारांच्या ऑनलाइन लॉगशिटची तपासणी करण्यात आली. संशयास्पद पॅटर्न आढळलेल्या उमेदवारांची वैयक्तिक माहिती आणि परीक्षा प्रक्रियेतील हालचालींचीही पडताळणी करण्यात आली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. गजानन पाचे, अंकित वाघमारे यांच्यासह त्यांना मदत केल्याचा आरोप असलेल्या संस्थेतील विकास गायकवाड आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तसेच या ‘हायटेक कॉपी’मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, उमेदवारांना बाहेरून मदत करणारे मोठे नेटवर्क कार्यरत होते का, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!