पुण्यात रस्त्यात पत्नी प्रियकरासोबत दिसली; पतीने अडवताच वाद पेटला, पुढे जे घडलं ते हादरवणारं

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत मोटरसायकलवरून जाताना पाहिल्यानंतर रिक्षाचालक पतीने त्यांना रस्त्यात अडवलं. यानंतर झालेल्या वादातून पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या मामाने रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर त्याच्या खिशातील रोख रक्कमही जबरदस्तीने काढून घेतल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणी पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या युनिट-४ च्या पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. राजू तिमय्या राव उर्फ धोत्रे आणि गणेश अशोक रेड्डी (वय ३६, दोघेही रा. भाऊ पाटील रोड, आदर्शनगर, बोपडी, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.

नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, एका रिक्षाचालकाने आपल्या पत्नीला एका पुरुषासोबत मोटरसायकलवरून जाताना पाहिलं. त्यानंतर त्याने दोघांना रस्त्यात अडवलं. यावेळी त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं.


पत्नीचा प्रियकर आणि त्याच्या मामाने मिळून रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर त्याच्या खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर पीडित रिक्षाचालकाने लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांची कारवाई
दरम्यान, २५ ऑगस्ट रोजी गुन्हे शाखेच्या युनिट-४चं पथक खडकी परिसरात गस्त घालत होतं. त्यावेळी पोलीस अंमलदार अनिकेत भोसले आणि जहांगीर पठाण यांना आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली.
लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले फरार आरोपी औंध परिसरातील ‘भक्ती प्लाझा अपार्टमेंट’जवळ थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी छापा टाकला.
यावेळी दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी त्यांना लोहगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.