आई राजा..! तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून; घटस्थापनेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंतचा संपूर्ण कार्यक्रम जाणून घ्या


पुणे : तुळजापूरची श्री तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. यंदाही नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून, 11 ते 27 ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

यंदाच्या उत्सवाला 11 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. तर 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता होमावरील धार्मिक विधीनंतर घटोत्थापन करण्यात येईल. नवरात्रोत्सवापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे.

तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव घटस्थापनेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत विविध धार्मिक विधींनी साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथूनही मोठ्या संख्येने भाविक तुळजापूरमध्ये दर्शनासाठी दाखल होतात. नवरात्रोत्सवात दररोज रात्री देवीची छबिना मिरवणूक काढली जाते. यासोबतच देवीची विविध अलंकारांनी पूजा केली जाते.

3 ऑक्टोबरपासून मंचकी निद्रा

नवरात्रोत्सवापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळपासून तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस सुरुवात होईल. 11 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल. त्यानंतर दुपारी घटस्थापना होऊन रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येईल.

12 ते 14 ऑक्टोबरदरम्यान देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना मिरवणूक होईल. 15 ऑक्टोबर रोजी ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा होणार असून, रात्री छबिना मिरवणूक निघेल.

विविध अलंकारांनी सजणार तुळजाभवानी माता

16 ऑक्टोबर रोजी मुरली अलंकार पूजा होईल. 17 ऑक्टोबरला शेषशाही अलंकार पूजा, तर 18 ऑक्टोबरला भवानी तलवार अलंकार पूजा करण्यात येईल. या तिन्ही दिवशी रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

19 ऑक्टोबर रोजी दुर्गाष्टमीनिमित्त महिषासुरमर्दिनी अलंकार पूजा केली जाईल. यासोबतच वैदिक होम-हवनाचे आयोजन करण्यात येणार असून, रात्री छबिना मिरवणूक निघेल.

20 ऑक्टोबरला होमावरील धार्मिक विधी

यंदा 20 ऑक्टोबर रोजी महानवमी आणि विजयादशमी म्हणजेच दसरा तिथी एकाच दिवशी येत आहे. त्यामुळे या दिवशी दुपारी 12 वाजता होमकुंडावर धार्मिक विधी आणि अजाबलीचा विधी होईल. त्यानंतर घटोत्थापन करण्यात येणार असून नवरात्रोत्सवातील उपवास सोडले जातील.

विजयादशमीनिमित्त रात्री नगरहून येणाऱ्या पलंग आणि पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

21 ऑक्टोबरला सीमोल्लंघन सोहळा

21 ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा होणार आहे. त्यानंतर सकाळी देवी नगरच्या पलंगावर विसावणार आहे. यानंतर मंचकी निद्रेचा कालावधी सुरू होईल.

सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबिना

तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा पाच दिवस चालणार आहे. त्यानंतर 26 ऑक्टोबर रोजी पहाटे देवीची पुन्हा सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल.

याच दिवशी दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापूर शहरात आगमन होणार आहे. रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह तुळजाभवानी मातेची भव्य छबिना मिरवणूक काढण्यात येईल.

25 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी होणार असून, या संपूर्ण कालावधीत तुळजापूरमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळणार आहे. नवरात्रोत्सवासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता असून, मंदिर प्रशासनाकडूनही विविध तयारी केली जाणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!