अट्टल गुन्हेगार राज पवार पुन्हा एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध; १४ गंभीर गुन्ह्यांची पोलिस अभिलेखावर नोंद.

लोणी काळभोर, ता. २८ : प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही गुन्हेगारी कारवाया सुरूच ठेवून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर लोणी काळभोर पोलिसांनी पुन्हा एकदा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली आहे. राज रविंद्र पवार (वय २८, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, ता. हवेली, जि. पुणे) याला तब्बल एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार हा लोणी काळभोर तसेच हडपसर पोलिस ठाण्यांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईला न जुमानता त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू ठेवल्याचे तपासात समोर आले.३ सप्टेंबर २०२४ रोजीही राज पवारवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून त्याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतरही त्याने लोणी काळभोर परिसरात पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

राज पवारविरुद्ध खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे, जीवितास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृत्ये, गंभीर धमकी, मृत्यूची भीती दाखवून खंडणी तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.सततच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे पवार हा सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुन्हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला. त्यानुसार त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले.


पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर आणि प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.सदर कारवाई पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर तसेच पोलिस हवालदार विलास शिंदे, पोलिस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे, चेतन कुंभार, अमोल जाधव आणि गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.