१७ वर्षांचा संसार एका रात्रीत संपला; शिल्पा गवारे प्रकरणात पतीसह चौघांना अटक, फडणवीसांचा थेट फोन!


पिंपरी-चिंचवड : वाकडमधील शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. तब्बल १७ वर्षांच्या संसारानंतर शिल्पा यांचा संशयास्पद मृत्यू झाला. माहेरच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिल्पाच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला आणि हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचं आश्वासन दिलं.

शिल्पा गवारे या भाजप नगरसेविका स्नेहा कलाटे यांच्या नणंद होत्या. शिल्पाच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, लग्नानंतर शिल्पावर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी सातत्याने दबाव टाकला जात होता. दोन एकर जमीन, व्यवसायासाठी आर्थिक मदत आणि वेळोवेळी लाखो रुपयांची रोकड माहेरकडून देण्यात आली, तरी कथित छळ थांबला नाही.

माहेरच्यांकडून मदत, तरीही मागण्या कायम?

शिल्पाचा संसार टिकावा आणि मुलांचं भविष्य सुरक्षित राहावं, या विचाराने तिच्या माहेरच्या मंडळींनी अनेकदा आर्थिक मदत केल्याचा दावा आहे. मात्र, सासरच्या मंडळींच्या अपेक्षा वाढतच गेल्या, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शिल्पाला माहेरी परत येण्याचा सल्ला आई-वडील आणि भावांनी दिला होता. मात्र, संसार आणि मुलांचा विचार करून तिने सासरी राहणं पसंत केलं.

या प्रकरणात शिल्पाचे पती सचिन गवारे, सासरे उत्तम, सासू संजीवनी आणि दीर संदीप यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनंतर वाकड पोलिसांनी चौघांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने चौघांनाही ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आत्महत्या की हत्या? मृत्यूभोवती प्रश्नचिन्ह

शिल्पाच्या मृत्यूची परिस्थिती सध्या तपासाचा केंद्रबिंदू ठरली आहे. पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यानुसार, शिल्पाने गळफास घेतल्यावेळी बेडरूमचं दार उघडं असल्याचं समोर आलं आहे. ही घटना मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. त्यावेळी पती सचिन घरात असताना तो बेडरूममध्ये का नव्हता, असा सवाल शिल्पाच्या कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

त्यामुळे शिल्पाने खरंच आत्महत्या केली का, की या घटनेमागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. माहेरच्या मंडळींनी शिल्पाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पतीबाबत तपासात आणखी धक्कादायक माहिती

शिल्पाच्या मृत्यूच्या तपासादरम्यान तिच्या पतीबाबत आणखी एक गंभीर बाब समोर आल्याची माहिती आहे. सचिन गवारे याच्यावर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याचं सांगितलं जात आहे. ही माहिती लग्नाच्या वेळी कलाटे कुटुंबीयांपासून लपवण्यात आली होती, असा आरोपही करण्यात आला आहे.

दरम्यान, वाकड परिसरात गेल्या दीड वर्षात हुंडाबळीच्या दोन घटना समोर आल्याने चिंता वाढली आहे. यापूर्वी वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आलं होतं. आता शिल्पा गवारे यांच्या मृत्यूने पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन

शिल्पाच्या वहिनी स्नेहा कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधला. शिल्पाला न्याय मिळावा आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा, अशी मागणी त्यांनी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद घालत दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली.

यावर फडणवीस यांनी प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचं आश्वासन दिलं. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचं कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं आहे.

आता शिल्पाच्या मृत्यूमागचं नेमकं सत्य काय, कथित हुंड्याच्या छळामागे कोणती कारणं होती आणि मृत्यूच्या रात्री घरात नेमकं काय घडलं, याचा उलगडा पोलिसांच्या पुढील तपासातून होणार आहे. मुख्यमंत्री स्तरावरून फास्ट ट्रॅक कोर्टाचं आश्वासन मिळाल्याने या प्रकरणातील पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!