येरवडा जेलमध्ये जमली कैद्यांची जोडी; आत बसून आखला प्लॅन, बाहेर येताच केलं असं कांड की पोलीसही हादरले


पुणे : कैद्यांचे पुनर्वसन आणि सुधारणा करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा मध्यवर्ती कारागृहातूनच सायबर गुन्ह्यांचं जाळं चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेलमध्ये झालेल्या ओळखीतून दोन आरोपींनी सायबर गुन्हेगारांना बँक खाती उपलब्ध करून देण्याचा कट रचल्याचं तपासात उघड झालं आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे.

शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत मावळ येथील एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त अधिकाऱ्याची तब्बल 86 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (वय 28, रा. लातूर) आणि तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय 24, रा. मरकळगाव, पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

जेलमध्येच रचला कट

अविनाश बाकलिकर हा बीएमएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात दीड वर्षापासून येरवडा कारागृहात होता. तर तेजस लोखंडे हा अपहरण आणि खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. कारागृहात दोघांची ओळख झाली आणि याच काळात त्यांनी सायबर गुन्हेगारांना ‘म्युल खाती’ उपलब्ध करून देण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

अविनाशने जेलमधील इतर आरोपींचे संपर्क क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये ‘युनिव्हर्सिटी’ या सांकेतिक नावाने सेव्ह करून ठेवल्याचं तपासात समोर आलं आहे.

जामिनावर बाहेर येताच पुन्हा सक्रिय

जामिनावर बाहेर आल्यानंतर अविनाशने जेलमधील संपर्कांचा वापर करत विविध सायबर गुन्ह्यांसाठी तब्बल आठ बँक खाती मिळवल्याचं पोलिसांनी सांगितलं. एवढंच नाही तर बँक खाती उपलब्ध करून देण्यासाठी ‘सस्टेनब्लॉक कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘स्टुनोव्हस प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने बोगस कंपन्यांची कार्यालये सुरू करण्यात आली होती.

60 वर्षीय अधिकाऱ्याला 86 लाखांचा गंडा

मावळ येथील खासगी कंपनीतून उपमहाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेल्या 60 वर्षीय अधिकाऱ्याला शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. 10 जून ते 14 जुलै या कालावधीत त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल 86 लाख रुपये जमा करून घेण्यात आले.

यातील 5 लाख रुपये तेजस लोखंडे याच्या खात्यावर जमा झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्यातून या संपूर्ण सायबर फसवणूक प्रकरणाचे धागेदोरे आरोपींपर्यंत पोहोचले.

लातूर आणि पुण्यातून आरोपी जेरबंद

पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाले आणि पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी लातूर आणि पुणे परिसरातून दोन्ही आरोपींना अटक केली.

या प्रकरणात परदेशातील काही साथीदारांचाही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, सायबर फसवणुकीच्या या नेटवर्कचा आणखी तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!