तिबेटमध्ये 37 भाविक अडकले अन् उद्याचं विमान धोक्यात; फडणवीसांच्या दखलीनंतर पहाटे 6 वाजता काठमांडूकडे रवाना!


काठमांडू : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून मायदेशी परतताना तिबेटमधील सागा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील 37 भाविकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता सर्व भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टच्या मार्गाने काठमांडूकडे रवाना झाले आहेत.

ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील हे भाविक जय गिरनारी ट्रस्ट, अलिबागचे प्रमोद केणे यांच्यासोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेले होते. यात्रा पूर्ण केल्यानंतर परतीच्या प्रवासात ते सागा येथे अडकले. नेपाळमध्ये आलेल्या महापुरामुळे रस्ते आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने त्यांच्या पुढील प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला होता.

या 37 भाविकांचे काठमांडूहून 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजताचे विमान बुक करण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत काठमांडू गाठणे अत्यंत गरजेचे होते. सागामध्ये अडकल्यामुळे विमान सुटण्यापूर्वी काठमांडू गाठता येईल का, याची चिंता भाविकांसह त्यांच्या कुटुंबीयांना सतावत होती.

या अडचणीची माहिती भाविकांच्या समूहातील नितीन शिर्के आणि राकेश जितेकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच फडणवीस यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत भाविकांना सुरक्षितपणे काठमांडूपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यानंतर महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार आणि केंद्रातील संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडूनही आवश्यक मदत आणि सहकार्य मिळाल्यानंतर भाविकांच्या पुढील प्रवासाचा मार्ग मोकळा झाला.

संकटातून मार्ग निघाल्यानंतर शुक्रवारी सकाळी 6 वाजता 37 भाविक सागा येथून न्यालम चेक पोस्टच्या दिशेने रवाना झाले. आता त्यांना वेळेत काठमांडू गाठून 29 ऑगस्टच्या नियोजित विमानाने मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे. भाविकांचा प्रवास सुरू झाल्याने महाराष्ट्रातील त्यांच्या कुटुंबीयांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

नेपाळमधील महापूर आणि तिबेट परिसरातील वाहतुकीच्या अडचणींमुळे कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्राच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयामुळे 37 महाराष्ट्रीय भाविकांना पुढील प्रवासासाठी मदत मिळाली.

संकटाच्या काळात तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल भाविकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले आहेत. आता 29 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजताच्या विमानाने हे 37 भाविक सुखरूप मायदेशी परततात का, याकडे त्यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!