शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30% कमी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली ‘ही’ टेक्नॉलॉजी, शेतकऱ्यांना मोठा फायदा

नाशिक : नाशिक जिल्ह्याने शेती आणि फळबागांच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली असून, येथील शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर देशभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाशिकच्या शेती क्षेत्राचं कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्राक्ष निर्यातीपासून कांद्यापर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
दिंडोरी येथे नूतन कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं. “देशाच्या द्राक्ष निर्यातीत जवळपास 80 टक्के निर्यात नाशिकमधून होते. नाशिकने हे नाव आपल्या मेहनतीने कमावलं आहे,” असं फडणवीस म्हणाले.

नाशिकच्या कांद्याचाही त्यांनी खास उल्लेख केला. “नाशिकचा कांदा संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. लासलगावसारखं कांद्याचं मोठं केंद्र नाशिकमध्ये आहे,” असं त्यांनी सांगितलं.


कांद्याच्या दरावर बोलताना फडणवीस यांनी मिश्कील टिप्पणीही केली. “कांद्याला चांगले भाव असतील तर कोणी कांदे घेऊन येत नाही. वर्षातून एखाद्या वेळी कांद्याची भेट मिळते. भाव पडले की कांदे भेट म्हणून मिळतात,” असं ते म्हणाले. मात्र, शेतमालाला योग्य भाव मिळणं हा शेतकऱ्यांचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
शेतमालाच्या दरात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची जाणीव असल्याचं सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं अत्यंत आवश्यक आहे.
AI मुळे उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता
राज्यातील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांची गुंतवणूक क्षमता मर्यादित आहे. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा ठरतो. “AI चा वापर केल्यास उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो. ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात,” असं फडणवीस यांनी सांगितलं.
शेती क्षेत्रात संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दिंडोरीतील नूतन कृषी महाविद्यालय हे भविष्यात शेती संशोधनाचं केंद्र बनावं आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जमिनीचा पोत सुधारण्यावर भर
शेती क्षेत्रात विविध माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठीही सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. रासायनिक खतांच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
शेतीतील उपलब्ध क्षमता योग्य पद्धतीने वापरणं, संशोधनाला चालना देणं आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, यावर आगामी काळात भर देण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.