लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 3000 जमा होणार? सत्ताधारी आमदाराची मोठी मागणी; सांगितला फॉर्म्युला

पुणे : लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणारे मासिक मानधन 1500 रुपयांवरून थेट 3000 रुपये करावे, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करण्यासाठी आमदारांचे पगार कमी करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. ‘आमदारांचे पगार कमी करा, मात्र लाडक्या बहिणींचे मानधन 1500 वरून 3000 रुपये करा’, अशी भूमिका रवी राणा यांनी मांडली. रक्षाबंधनाच्या दिवशी अमरावतीत महिलांनी त्यांना राखी बांधल्यानंतर त्यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवून तो महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे जुलै महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही रवी राणा यांची भूमिका
दरम्यान, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरूनही रवी राणा यांनी भाष्य केले आहे. अमरावतीहून यवतमाळ येथील आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निवासस्थानाकडे निघालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन परतावे, अशी विनंती त्यांनी केली.
येत्या 7 सप्टेंबर रोजी मुंबईतील मंत्रालयात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासोबत विद्यार्थ्यांची बैठक होणार असल्याचे रवी राणा यांनी सांगितले. या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर आपण स्वतः विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांना पत्र दिले असून, विद्यार्थ्यांनी या पत्राचा मान ठेवून आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन रवी राणा यांनी केले. मात्र, विद्यार्थी आंदोलनावर ठाम असून त्यांनी यवतमाळच्या दिशेने कूच सुरू ठेवली आहे. त्यामुळे या आंदोलनावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.