पतीच्या मोबाईलमध्ये अश्लील मेसेज दिसले; जाब विचारताच पत्नीसोबत धक्कादायक प्रकार, पुण्यात विवाहितेची पोलिसांत धाव

पुणे : पतीच्या मोबाईलवर आलेले आक्षेपार्ह मेसेज पाहिल्यानंतर त्याचा जाब विचारणे एका 39 वर्षीय विवाहितेला महागात पडल्याची घटना पुण्यात समोर आली आहे. जाब विचारल्याच्या रागातून पतीसह सासरच्या मंडळींनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
तसेच लग्न झाल्यापासूनच माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सततच्या छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये विश्वजित विवेक खरात (वय 39), विवेक काठोराम खरात (वय 55), पूजा विवेक खरात (वय 42), वैदेही विवेक खरात (वय 28) आणि योगेश काठोराम खरात (वय 52) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील डॉ. कोयाजी रोड, बॉम्बे गॅरेज कॅम्प परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.


अश्लील मेसेजचा जाब विचारताच मारहाण
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतरपासूनच पती आणि सासरच्या मंडळींकडून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. माहेरहून पैसे आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.
दरम्यान, पतीच्या मोबाईलवर आलेले अश्लील मेसेज महिलेच्या निदर्शनास आले. याबाबत तिने पतीला जाब विचारला. त्यावर संतापलेल्या पती आणि सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकारानंतर महिलेने लक्ष्मीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.