सणासुदीत मुंबईकरांना महागाईचा डबल झटका! साखरेनंतर दूधही महागणार; 1 लिटरमागे किती रुपयांची वाढ?


मुंबई : महागाईचा वाढता ताण आता मुंबईकरांच्या घरखर्चावर आणखी जाणवणार आहे. दुधाच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईत घाऊक दूध दरात तब्बल 9 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळातच मुंबईकरांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

मुंबई दुग्ध उत्पादक संघाच्या बैठकीत दुधाच्या घाऊक दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. सध्या मुंबईत दुधाचा घाऊक दर प्रतिलिटर 93 रुपये आहे. प्रस्तावित 9 रुपयांच्या वाढीनंतर हा दर 102 रुपये प्रतिलिटर होण्याची शक्यता आहे. हे नवे दर 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीसाठी लागू केले जाणार असल्याचे समोर आले आहे.

दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमतींसोबतच पशुखाद्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी यांसारख्या पशुखाद्यांच्या किमतीत तब्बल 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय चारा आणि पेंड यांच्या दरातही वाढ झाल्याने दूध उत्पादकांवर आर्थिक भार वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर सभागृहात झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, दुधासोबतच साखरेच्या वाढत्या दरानेही ग्राहकांची चिंता वाढली आहे. सणासुदीच्या काळात साखरेच्या किमतीत वाढ झाल्याने घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. भविष्यात साखरेच्या दरात आणखी वाढ होऊ नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनानेही पावले उचलली आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी 4,000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवण्यास मर्यादा घालण्यात आली आहे.

त्यामुळे एकीकडे दूध महागण्याची शक्यता आणि दुसरीकडे साखरेच्या दरवाढीचा परिणाम, अशा दुहेरी कात्रीत सर्वसामान्य ग्राहक सापडण्याची शक्यता आहे. विशेषतः आगामी सणासुदीच्या काळात या दरवाढीचा घरखर्चावर किती परिणाम होतो, याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!